- Home
- lifestyle
- Hair Care Tips : हेअर डाय विसरा... हे पदार्थ खाल्ले तर वयाच्या 70व्या वर्षीही केस राहतील काळेभोर
Hair Care Tips : हेअर डाय विसरा... हे पदार्थ खाल्ले तर वयाच्या 70व्या वर्षीही केस राहतील काळेभोर
केसांना नुसतं बाहेरून तेल-शॅम्पू लावून चालत नाही. ते काळे, दाट आणि चमकदार दिसावे यासाठी आपण काय खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आहारात काही खास पदार्थांचा समावेश केल्यास केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहायला मदत होते. कोणते आहेत हे पदार्थ?

केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पदार्थ
केसांचा रंग हा 'मेलेनिन' (Melanin) नावाच्या घटकावर अवलंबून असतो. वय वाढणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा ताणतणाव यामुळे मेलेनिनची निर्मिती कमी होते. मग काय, केस पांढरे होऊ लागतात. अशावेळी योग्य पोषण देणारा आहार घेतला, तर केसांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते.

आहारात आवळ्याचा समावेश करा
केसांच्या आरोग्याविषयी बोलायचं तर सगळ्यात आधी आवळ्याचं नाव येतं. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. केस अकाली पांढरे होण्यापासून रोखायचं असेल आणि त्यांचा नैसर्गिक रंग टिकवायचा असेल, तर आवळा नक्की खा.
कढीपत्त्याकडे दुर्लक्ष करू नका
कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि नैसर्गिक रंग टिकवायला मदत करतात. कढीपत्ता नुसता फोडणीत टाकण्याऐवजी, खोबरेल तेलात उकळून ते तेल केसांना लावता येतं. किंवा कढीपत्त्याची चटणीही करून खाता येते.
काळे तीळ विसरू नका
केसांचा रंग टिकवून ठेवायचा असेल, तर काळे तीळ आहारात असायलाच हवेत. यात तांबे, लोह, मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतात. यामुळे केस मजबूत होतात आणि मेलेनिन तयार होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते.
गाजर आणि बीटरूट खा
गाजरात व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे टाळूचं आरोग्य उत्तम ठेवतात. तुम्ही गाजराचा ज्यूस, सॅलड किंवा भाजी करून खाऊ शकता. तर बीटरूटमध्ये फोलेट, नायट्रेट आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते ज्यूस, सॅलड किंवा उकडून खाल्ल्यास केसांसाठी फायदेशीर ठरतं.
पालक देईल आवश्यक पोषण
पालकमध्ये लोह आणि फोलेटसोबतच अनेक पोषक तत्वं असतात जी केसांसाठी आवश्यक असतात. यामुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं. पालक सॅलड, भाजी, ज्यूस किंवा स्मूदीच्या रूपात रोजच्या आहारात घेऊ शकता.
अक्रोड आणि बदामही आहेत फायदेशीर
अक्रोडमध्ये तांबे, ओमेगा -३ फॅटी ॲसिडस् आणि बायोटिन असतं. याचा आहारात नियमित समावेश केल्यास केस आणि टाळूचं आरोग्य सुधारतं. रोज ४-५ अक्रोड खाण्याची सवय लावून घ्या.
शेवगा आणि अंडी
शेवग्याच्या पानांमध्ये झिंक, लोह आणि व्हिटॅमिन बी ६ असे अनेक पोषक घटक असतात. तुम्ही शेवग्याच्या पानांची पावडर स्मूदीमध्ये टाकून घेऊ शकता किंवा त्याची भाजी, सूप करून खाऊ शकता. याशिवाय, अंड्यामध्ये प्रोटीन, बायोटिन आणि बी जीवनसत्त्व असतं, जे केसांचं आरोग्य जपायला मदत करतं.
आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल लावा
आहारासोबतच केसांची बाहेरून निगा राखणंही तितकंच गरजेचं आहे. आठवड्यातून किमान एकदा केसांना तेल लावायलाच हवं. आवळा, भृंगराज आणि ब्राह्मी यांसारख्या वनौषधींचा अर्क असलेलं तेल वापरून टाळूला मसाज केल्यास खूप फायदा होतो.
पांढरे केस कायमचे काळे होऊ शकतात का?
पांढरे झालेले केस पुन्हा कायमचे काळे करण्याचा कोणताही खात्रीशीर मार्ग नाही. पण, सकस आहार, पुरेशी पोषक तत्वं आणि केसांची योग्य काळजी घेतल्यास केस अकाली पांढरे होण्याचा वेग नक्कीच कमी करता येतो आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं.

