- Home
- lifestyle
- Gold Exchange : पूर्वजांचं सोनं देऊन नवीन सोनं घेणं अशुभ आहे का? जुनं सोनं विकल्यास काय होतं?
Gold Exchange : पूर्वजांचं सोनं देऊन नवीन सोनं घेणं अशुभ आहे का? जुनं सोनं विकल्यास काय होतं?
आजकाल प्रत्येकाच्या घरात सोनं असतंच. काहींनी जुनं सोनं जपून ठेवलंय, तर काहींनी नवीन घेतलंय. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सोनं विकू नये का? जुनं सोनं विकल्यास किंवा एक्सचेंज केल्यास काय होतं? याबद्दलच्या धार्मिक मान्यता काय आहेत? जाणून घ्या.

जुनं सोनं एक्सचेंज करणं अशुभ आहे का?
गरीब असो वा श्रीमंत, भारतीय घरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेलं सोनं असतंच. सोनं नसलेलं घर सापडणं कठीण. आपले पूर्वज खूप हुशार आणि दूरदृष्टी असलेले होते. त्यामुळेच ते कष्टाच्या पैशातून सोनं खरेदी करायचे. हे सोन्याच्या मोहापायी नव्हे, तर कठीण काळात उपयोगी पडेल या दूरदृष्टीने केलं जायचं.
खरेदी केलेलं सोनं घालण्यापेक्षा ट्रंकमध्ये सुरक्षित ठेवणंच जास्त पसंत केलं जायचं. लग्न, सण-समारंभ सोडले तर सोन्याचं प्रदर्शन कधीच केलं नाही. पण त्यावेळी कमी किमतीत घेतलेल्या सोन्याचे भाव आज गगनाला भिडलेत. शिवाय अनेक कुटुंबांमध्ये पहिल्या पिढीने जमवलेलं सोनं आता मुलं, नातवंडांच्या हाती आलंय आणि ते जुनं सोनं विकून नवीन दागिने घडवण्याकडे कल वाढतोय.

जुनं सोनं देऊन नवीन खरेदी करणं अशुभ आहे का?
पण जुने दागिने देऊन नवीन दागिने एक्सचेंज करणं शुभ असतं का? या वर्षी जानेवारीत सोन्याचे भाव वाढले होते. पण सध्या सोन्याचे दर थोडे कमी झालेत. यादरम्यान जुने दागिने नवीन दागिन्यांसोबत एक्सचेंज करणाऱ्यांची संख्या वाढतेय. हा फक्त अंदाज नाही, तर वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.
होय, नुकतंच वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने एक सर्वेक्षण केलं. त्यानुसार ७६ टक्के लोकांनी घरात ठेवलेले जुने दागिने देऊन नवीन दागिने एक्सचेंज करण्यात जास्त रस दाखवलाय. म्हणजे आजच्या पिढीसाठी हा धार्मिक श्रद्धेचा विषय नसून, ते प्रत्येक गोष्टीकडे गुंतवणूक आणि बजेटच्या दृष्टीने पाहताहेत.
प्राचीन भारतीय धार्मिक ग्रंथांमध्ये सध्याच्या किरकोळ एक्सचेंजबद्दल कोणतेही नियम सांगितलेले नाहीत. पण धनत्रयोदशी किंवा दिवाळीला जुने दागिने देणं म्हणजे पिढ्यानपिढ्या घरात असलेल्या लक्ष्मीला घालवून देण्यासारखं मानलं जातं. म्हणजे जेव्हा तुम्ही जुनं सोनं विकता, तेव्हा दुर्दैव तुमच्या पाठी लागतं, असं धार्मिक ग्रंथ सांगतात. पण हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही, हे लक्षात घ्यायला हवं.
दिवाळीला लक्ष्मीपूजन केलं जातं. हा सण संपत्ती वाढवणारा आणि घरात शुभ आणणारा मानला जातो. अशा वेळी घरातील पैसे, सोन्याचे दागिने आणि विशेषतः जुन्या काळातील दागिने विकणं किंवा एक्सचेंज करणं शुभ मानलं जात नाही.
जुनं सोनं विकण्यापूर्वी..
तुमच्या घरात जर पूर्वजांच्या काळातील सोन्याचे दागिने असतील आणि ते विकण्याची किंवा एक्सचेंज करण्याची वेळ आली असेल, तर त्यापूर्वी जुन्या सोन्याची शुद्धता, वितळवण्याचा खर्च, वजन, एक्सचेंज रेट, घडणावळ, फायनल बिल किती होईल हे सगळं वेगळं समजून घ्या. त्यानंतरच एक्सचेंज करायचं की नाही ते ठरवा. सहसा सणासुदीच्या काळात जुन्या आणि नवीन अशा दोन्ही सोन्याच्या दरात वाढ असते.
टीप: हा लेख आध्यात्मिक तज्ज्ञ आणि धार्मिक ग्रंथांच्या माहितीवर आधारित प्राथमिक माहिती आहे. सोनं विकण्यापूर्वी किंवा एक्सचेंज करण्यापूर्वी सोन्याच्या व्यापाऱ्यांशी बोलून मगच निर्णय घ्या.

