Japanese Skincare : खूप सारे प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी, जपानी लोक त्वचेसाठी काही सोप्या गोष्टी वापरतात. डबल क्लिंजिंग, ग्रीन टी, सनस्क्रीन आणि शीट मास्क... यांसारख्या गोष्टींनी त्यांची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार, तरुण आणि निरोगी दिसते. हेच आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट.
Japanese Skincare : आजकाल प्रत्येकालाच चमकदार आणि तरुण त्वचा हवी असते. पण अनेक प्रोडक्ट्स वापरूनही आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही. अशावेळी जपानी स्किनकेअर रुटीन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या रुटीनमध्ये जास्त प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी योग्य पद्धतींवर भर दिला जातो, ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि सुंदर दिसू शकते.
कमी प्रोडक्ट्स, जास्त फायदा
जपानी स्किनकेअरची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट्स लागत नाहीत. इथे संख्येपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जातं. योग्य प्रोडक्ट्स आणि नियमित काळजी घेतली, तर तुमची त्वचा दीर्घकाळ तरुण आणि ताजीतवानी राहू शकते.
सुरुवात करा डबल क्लिंजिंगने
जपानी रुटीनमध्ये 'डबल क्लिंजिंग'ला खूप महत्त्व दिलं जातं. यात पहिल्यांदा ऑइल-बेस्ड क्लिंजरने मेकअप आणि धूळ काढली जाते. त्यानंतर फेस वॉशने त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. यामुळे पोअर्स (pores) स्वच्छ राहतात आणि त्वचा निरोगी बनते.
ग्रीन टीने मिळवा नैसर्गिक चमक
ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचं नुकसान होण्यापासून वाचवतात आणि जळजळ कमी करतात. तुम्ही याचा वापर टोनर, फेस मास्क किंवा एखाद्या स्किनकेअर प्रोडक्टच्या स्वरूपात करू शकता. यामुळे त्वचा फ्रेश आणि चमकदार दिसते.
सनस्क्रीन आहे सर्वात महत्त्वाचं
जपानी लोक तर सनस्क्रीन लावल्याशिवाय घराबाहेर पडतच नाहीत. सूर्याच्या किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी रोज हलकं आणि पटकन त्वचेत मुरणारं सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. यामुळे त्वचा लवकर म्हातारी दिसत नाही आणि तिचं नुकसानही टळतं.
हळुवार एक्सफोलिएशनने त्वचा बनेल मुलायम
त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी डेड स्किन सेल्स (मृत पेशी) काढणं महत्त्वाचं आहे. जपानी स्किनकेअरमध्ये हळुवारपणे एक्सफोलिएशन करण्यावर भर दिला जातो. यासाठी तांदळावर आधारित किंवा एन्झाइम स्क्रबसारख्या गोष्टी वापरल्या जातात, ज्यामुळे त्वचेला इजा न होता ती स्वच्छ होते.
शीट मास्कने द्या एक्स्ट्रा केअर
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शीट मास्क वापरल्याने त्वचेला खोलवर ओलावा (हायड्रेशन) मिळतो. यामुळे त्वचेला झटपट चमक येते आणि ती मऊ-मुलायम बनते.
थोडक्यात काय, तर जपानी स्किनकेअर रुटीन हे साधेपणा आणि सातत्य यावर टिकून आहे. जर तुम्ही हे रुटीन योग्य प्रकारे फॉलो केलं, तर तुमची त्वचा केवळ निरोगी दिसणार नाही, तर तुमच्या वयापेक्षा तरुणही दिसेल.


