उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका मंदिरातून महिलेने हिंदू देवतांच्या मूर्तींवरील दागिने चोरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका मंदिरातून महिलेने देवाचे दागिने चोरल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना सआदतगंजच्या चौपतिया भागातील चार धाम मंदिरात रविवारी सकाळी घडली. या व्हिडिओमध्ये एक महिला देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरील चांदीची छत्री आणि नथ काढताना स्पष्ट दिसत आहे.

याशिवाय श्रीनाथजींच्या मूर्तीवरील मुकुटही मंदिरातून गायब असल्याची माहिती आहे. मूर्तीवरील दागिने गायब असल्याचे मंदिर व्यवस्थापनाच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली आणि हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती महिला आजूबाजूला कोणी पाहत तर नाही ना, याची खात्री करून हळूच गाभाऱ्यात शिरताना दिसते. त्यानंतर ती थेट देवी लक्ष्मीच्या मूर्तीजवळ जाते आणि दागिने काढते.

Scroll to load tweet…

व्हिडिओमध्ये ती महिला चांदीची छत्री आणि नथ घेऊन तिथून निघून जाताना दिसत आहे. पण श्रीनाथजींच्या मूर्तीचा मुकुट नेमका कसा आणि कधी चोरीला गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मंदिराचे पुजारी सियाराम अवस्थी यांनी देवी लक्ष्मीची चांदीची छत्री आणि नथ चोरीला गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच श्रीनाथजींच्या मूर्तीवरील मुकुटही गायब असल्याचे त्यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेजमधील वेळेनुसार, ही चोरी शनिवारी सकाळी साडेआठ ते साडेनवऊच्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, चोरीचा नेमका दिवस आणि व्हिडिओतील वेळ यात थोडी तफावत असून, त्याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.

या प्रकरणावर इन्स्पेक्टर संतोष आर्य यांनी सांगितले की, पोलिसांना अद्याप कोणतीही अधिकृत लेखी तक्रार मिळालेली नाही. तरीही पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, चोरी करणाऱ्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.