कर्नाटकमधील अवघ्या २ वर्षे १० महिन्यांच्या स्वरश्री हेगडेने तबल्यावर १२ ताल वाजवून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव नोंदवले आहे. तिच्या या अप्रतिम टॅलेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी या चिमुकलीचं भरभरून कौतुक करत आहेत.
कर्नाटकमधील एका २ वर्षे १० महिन्यांच्या चिमुकलीने आपल्या संगीतातील टॅलेंटने सर्वांना थक्क केलं आहे. तबल्यावर १२ ताल वाजवून आणि ते तोंडी म्हणून दाखवत तिने थेट 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवलं आहे. स्वरश्री हेगडे असं या चिमुकलीचं नाव असून ती उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावरची रहिवासी आहे. एक्स (X) वर तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, लोक तिच्या या कौशल्याला दाद देत आहेत.
भारतीय शास्त्रीय संगीतात 'ताल' हा खूप महत्त्वाचा मानला जातो. तबल्यावर ताल वाजवण्यासाठी हातांची अचूक हालचाल आणि लयीची समज असावी लागते. सोबतच तालाचे बोल तोंडी म्हणणं हे आणखी कठीण काम आहे. पण, तीन वर्षांचीही नसलेल्या स्वरश्रीने हे लीलया करून दाखवलं आहे. एवढ्या लहान वयात तिने दाखवलेली एकाग्रता आणि मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे.
पाहा हा व्हायरल व्हिडिओ
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
इंटरनेटवर या व्हिडिओला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एका युजरने म्हटलंय की, या चिमुकलीवर साक्षात सरस्वती देवीचा आशीर्वाद आहे. तर दुसऱ्या एकाने याला उत्तर कन्नडसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे.
स्वरश्रीच्या टॅलेंटचं कौतुक करताना एका युजरने तिच्या नावाचा संदर्भ देत लिहिलं, "ही खरोखरच देणगी आहे. तिच्या आई-वडिलांनी हे कसं ओळखलं असेल आणि तिचं नाव 'स्वरश्री' ठेवलं असेल याचं नवल वाटतं." आणखी एकाने लिहिलं, "हे अविश्वसनीय आहे. जणू एखादी छोटी देवीच तबला वाजवत आहे आणि संगीताचे सर्व सूर गात आहे."
"अप्रतिम! असं वाटतंय की तिने आईच्या गर्भात असल्यापासूनच याचा सराव सुरू केला असावा," अशी मजेशीर प्रतिक्रिया चौथ्या युजरने दिली आहे.
