National Bird : भारतात अनेक पक्षी असताना मोरालाच राष्ट्रीय पक्षी का निवडलं?
Peacock : भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मात्र, आपल्या देशात शेकडो पक्षी असताना मोरालाच का निवडलं? हा निर्णय कधी घेण्यात आला? अशा रंजक गोष्टींबद्दल इथे वाचा.

मोरालाच राष्ट्रीय पक्षी का?
भारतात अनेक प्रकारचे पक्षी आहेत. प्रत्येक पक्षाचं एक वेगळेपण असतं. पण देशातील सर्व पक्ष्यांमध्ये मोराला एक खास स्थान आहे. म्हणूनच मोराची निवड आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून झाली आहे. पावसाळ्यात जेव्हा मोर आपले रंगीबेरंगी पिसारे फुलवून नाचतो, तेव्हा कोणीही मोहित होतो. पण मोराला राष्ट्रीय पक्षी निवडण्यामागचं कारण फक्त त्याचं सौंदर्य नाही. यामागे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कारणंही आहेत. १९६१ मध्ये भारतीय वन्यजीव मंडळाने राष्ट्रीय पक्षाच्या निवडीवर चर्चा केली. त्यावेळी मोराबरोबरच सारस क्रेन, हंस, ब्राह्मणी घार आणि माळढोक या पक्ष्यांची नावंही चर्चेत आली. अखेर १ फेब्रुवारी १९६३ ला भारत सरकारने मोराला अधिकृतरित्या राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलं.

देशभर आढळणारा पक्षी
मोराच्या निवडीचं मुख्य कारण म्हणजे तो देशभरात आढळतो. जम्मू-काश्मीरपासून ते तमिळनाडू, केरळपर्यंत आणि आसामसहित देशातील बहुतांश भागात मोर पाहायला मिळतो. म्हणजेच, हा पक्षी एका विशिष्ट भागापुरता मर्यादित नसून तो देशभरातील लोकांना परिचित आहे. राष्ट्रीय पक्षी म्हणून निवडला जाणारा पक्षी सर्वांना माहीत असायला हवा, या अटीत मोर अगदी बसतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भारतीय संस्कृतीशी असलेला त्याचा संबंध. श्रीकृष्णाच्या डोक्यावर मोराचं पीस असतं. तसंच कार्तिकेयाचं वाहन म्हणूनही मोराला ओळखलं जातं. आपली पुराणे, चित्रकला, आणि मंदिरातील शिल्पकलेत मोराला खास स्थान आहे. सौंदर्य, सन्मान आणि शुभ प्रतीक म्हणूनही मोराकडे पाहिलं जातं.
विशेष ओळख देणारे रूप
मोराला राष्ट्रीय पक्षी निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचं वेगळं रूप. डोक्यावरील सुंदर तुरा आणि लांब रंगीबेरंगी पिसारे यामुळे मोराला एक वेगळी ओळख मिळते. सरकारी कागदपत्रे, टपाल तिकिटे आणि अधिकृत चिन्हांमध्ये मोराचं चित्र सहज दाखवता येतं. लांबून पाहिल्यासही हा मोर आहे, हे सहज ओळखता येतं. त्यावेळी इतर कोणत्याही मोठ्या देशाने मोराला राष्ट्रीय पक्षी घोषित केले नव्हते, यामुळे भारताला एक वेगळी ओळख मिळाली. अशा प्रकारे सौंदर्य, देशभरातील उपस्थिती, भारतीय परंपरेशी असलेला संबंध आणि विशेष रूप यांसारख्या कारणांमुळे मोर राष्ट्रीय पक्षी बनला. सध्या मोर हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित आहे. त्याची शिकार करणं आणि मारणं हा कायद्याने गुन्हा आहे.

