लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्स 2026 नुसार, भारताने आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश म्हणून आपले स्थान कायम राखले आहे.
मुंबई : लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्सनुसार, 2026 मध्ये भारताने आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. आर्थिक क्षमतेत थोडी घट होऊनही, भारताचा एकूण पॉवर स्कोअर 40.5 अंकांवर पोहोचला आहे. या वर्षात भारताचा प्रभाव आशियात वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे. मुत्सद्देगिरी, संरक्षण सहभाग, सांस्कृतिक पोहोच आणि भविष्यातील संसाधनांमध्ये झालेली सुधारणा हे यामागचे प्रमुख कारण आहे.
या यादीत अमेरिका आणि चीनने अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे. भारताचा आर्थिक क्षमता स्कोअर थोडा घसरून 26.4 अंकांवर आला असला तरी, या श्रेणीत भारताने तिसरे स्थान टिकवून ठेवले आहे. रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) अर्थव्यवस्था मोजण्याच्या पद्धतीतील बदलामुळे ही घट झाल्याचे लोवी इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. परदेशातील गुंतवणुकीत सुमारे 20 अब्ज डॉलर्सची घट झाल्याचा फटकाही बसला. पण या आर्थिक आव्हानांनंतरही, भारताचा 'भविष्यातील संसाधने' स्कोअर 56.2 अंकांवर पोहोचला आहे. हे सुधारित आर्थिक अंदाज आणि देशापुढील संधी दर्शवते. “2026 मध्ये अर्थव्यवस्था आणि मुत्सद्देगिरीत संमिश्र परिणाम दिसले असले तरी, आशियात भारताचा प्रभाव वाढला आहे,” असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुत्सद्दी प्रभाव हा भारताचा सर्वात मजबूत पैलू ठरला असून, त्यात भारताला 70.3 गुण मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रादेशिक नेतृत्वाचे मूल्यमापन लक्षणीयरीत्या सुधारल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे ते तीन स्थानांनी वर जाऊन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यानंतर आशियातील दुसरे सर्वात प्रभावी नेते ठरले आहेत. भारताने आपले आर्थिक संबंधही मजबूत केले असून, त्यात दोन स्थानांनी प्रगती करत सातवे स्थान मिळवले आहे. प्रादेशिक व्यापार आणि गुंतवणूक संबंधांमधील स्थिरतेमुळे भारताने इतर अनेक देशांना मागे टाकले. भारताचा संरक्षण नेटवर्क स्कोअर 18.6 अंकांवर पोहोचला असून, त्यात भारताने नववे स्थान मिळवले आहे. आग्नेय आशियाला ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची विक्री आणि प्रादेशिक संरक्षण सहभागामुळे हे शक्य झाले. भारताचा सांस्कृतिक प्रभाव स्कोअरही वाढून 43.8 अंकांवर गेला आहे. अहवालानुसार, या प्रगतीमुळे भारताने 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या उपलब्ध संसाधनांचा प्रभाव आशियात दाखवून दिला आहे. पण, चीनची एकूण ताकद भारतापेक्षा अजूनही 80 टक्क्यांनी जास्त असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे, जे दोन देशांमधील दरी दर्शवते. 2026 आशिया पॉवर इंडेक्समध्ये आर्थिक व लष्करी क्षमता, लवचिकता आणि मुत्सद्दी प्रभाव यासारख्या आठ पैलूंतर्गत 131 निर्देशकांद्वारे 27 देशांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. (ANI)
















