कॅब सेवा देणाऱ्या उबर कंपनीने तब्बल ३,३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कंपनी आता ड्रायव्हरवर अवलंबून न राहता 'रोबोटॅक्सी' सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी १० अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. सीईओ दारा खोसरोशाही यांनी कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम' बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: जगभरात सुरू असलेल्या नोकरकपातीचं लोण आता प्रसिद्ध कॅब कंपनी 'उबर'पर्यंत पोहोचलं आहे. उबरने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास १० टक्के म्हणजे सुमारे ३,३०० लोकांना कामावरून काढून टाकलं आहे. खर्च कमी करणे आणि भविष्यातील नवीन तंत्रज्ञानावर गुंतवणूक करणे, या दोन प्रमुख कारणांसाठी कंपनीने हे कठोर पाऊल उचलल्याचं समजतंय.

नोकरकपातीचं कारण काय?

उबरचे सीईओ दारा खोसरोशाही यांनी कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवून या बदलांची माहिती दिली. त्यांच्या मते, गेल्या पाच वर्षांत उबरचा खूप वेगाने विस्तार झाला, ज्यामुळे कंपनीतील मॅनेजमेंटची रचना (Management Layers) खूप गुंतागुंतीची झाली होती. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होत होता. आता कंपनीत आर्थिक शिस्त आणण्यासाठी आणि निर्णय प्रक्रिया वेगवान करण्यासाठी ही पुनर्रचना केली जात आहे. याअंतर्गत कंपनीतील मॅनेजर्सची संख्या २० टक्क्यांनी कमी केली जाणार आहे.

आता ड्रायव्हर्सची गरजच भासणार नाही?

या नोकरकपातीतून वाचणारा पैसा कंपनी स्वयंचलित वाहनांवर (Autonomous Vehicles) गुंतवणार आहे. म्हणजेच, कंपनी आता ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या 'रोबोटॅक्सी' (Robotaxi) सेवेवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उबर तब्बल १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करण्याची योजना आखत आहे. ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी पार्टनर्सवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे.

'वर्क फ्रॉम होम' आता बंद!

नोकरकपातीसोबतच उबरने आपल्या कामाच्या पद्धतीतही मोठे बदल केले आहेत. आता बहुतेक कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परत येऊन काम करावं लागणार आहे. फक्त १ टक्के कर्मचाऱ्यांनाच घरातून काम करण्याची (Remote Work) परवानगी असेल. कंपनी न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरांना आपले प्रमुख ग्लोबल हब म्हणून विकसित करणार आहे. कामात सुसूत्रता आणण्यासाठी उबर आपले वेगवेगळे विभाग एकत्र करत आहे. रेस्टॉरंट, रिटेल आणि डायरेक्ट डिलिव्हरी टीम्सचं विलीनीकरण केलं जाणार आहे. तसेच, इंजिनिअरिंग आणि सायन्स टीममध्येही मोठे बदल केले जात आहेत.