Sikri Resort Controversy : हरियाणातील सिकरी येथील एका नामांकित रिसॉर्टमध्ये प्रसाधनगृहाबाहेर लावण्यात आलेल्या प्रतिमांवरून वाद निर्माण झाला आहे. 

Sikri Resort Controversy : हरियाणातील सिकरी येथे असलेल्या ‘मिलान रिसॉर्ट’मधील बँक्वेट हॉलमध्ये प्रसाधनगृहाचा मार्ग दर्शवण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्रतिमांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित प्रतिमा ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांशी साधर्म्य दर्शवत असल्याचा दावा होत असून, या प्रकारामुळे महाराष्ट्रासह हरियाणात संतापाची लाट उसळली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सिकरी येथील मिलान रिसॉर्टच्या बँक्वेट हॉलमध्ये स्त्री आणि पुरुष प्रसाधनगृहांची विभागणी दाखवण्यासाठी दरवाजांवर विशिष्ट वेशभूषेतील प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. पुरुष प्रसाधनगृहाबाहेरील प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पारंपरिक वेशभूषेशी मिळती-जुळती असल्याचा दावा केला जात आहे. तर महिलांच्या प्रसाधनगृहाबाहेरील प्रतिमा राणी पद्मिनी यांच्या रूपाशी साधर्म्य दर्शवत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद अधिक चिघळला.

शिवप्रेमी आणि हिंदू संघटनांचा संताप

हा प्रकार समोर येताच महाराष्ट्र आणि हरियाणातील शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रसाधनगृहासारख्या ठिकाणी महापुरुषांशी मिळत्याजुळत्या प्रतिमा वापरणे हा जाणीवपूर्वक केलेला अपमान असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. संबंधित प्रतिमा तात्काळ हटवून रिसॉर्ट प्रशासनाने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी – रोहित पवार

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापुरुषांचा अवमान सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी संबंधित रिसॉर्टवर तत्काळ बंदी घालावी आणि दोषींना जेलमध्ये टाकावे, अशी भूमिका मांडली. हरियाणा आणि महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांनी कोणताही पक्षपात न करता कठोर पावले उचलावीत, असेही त्यांनी नमूद केले.

“हरियाणा विधीमंडळात चर्चा व्हावी” – राजे मुधोजी भोसले

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राजे मुधोजी भोसले यांनीही संताप व्यक्त केला. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची विडंबना सहन केली जाणार नाही, असे सांगत त्यांनी संबंधित हॉल/रिसॉर्टचे मालक आणि माजी मंत्री मुलचंद शर्मा यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच हरियाणा सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विधीमंडळाच्या पटलावर चर्चा घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी केले.