Shashi Tharoor Defends LK Advani : अडवाणींच्या दीर्घ सेवेला एका घटनेवरून मोजणे आणि मर्यादित करणे योग्य नाही, असे काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले आहेत. तसेच, काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे.

Shashi Tharoor Defends LK Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या दीर्घ सेवेला एका घटनेवरून मोजणे आणि मर्यादित करणे योग्य नाही, असे काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले आहेत. तसेच, अडवाणींची बाजू घेण्यासाठी त्यांनी नेहरू आणि इंदिरा गांधींच्या प्रकरणांचा उल्लेख करून काँग्रेसला पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे. काँग्रेसने साहजिकच यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

अडवाणींच्या वाढदिवसानिमित्त थरूर यांनी दिल्या शुभेच्छा

अडवाणींच्या वाढदिवसानिमित्त थरूर यांनी 'X' वर केलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका वकिलाने, 'देशात द्वेषाची बीजे पेरणे ही समाजसेवा नाही,' असे म्हणत अडवाणींनी रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व केल्याचा उल्लेख केला होता.

यावर प्रतिक्रिया देताना थरूर म्हणाले, 'मी सहमत आहे. ती घटना महत्त्वपूर्ण असली तरी, त्यांनी इतकी वर्षे केलेल्या समाजसेवेला तेवढ्यापुरते मर्यादित ठेवणे योग्य नाही.' तसेच, 'नेहरूंच्या कार्याचे मोजमाप चीनसोबतच्या संघर्षातील अपयशावरून किंवा इंदिरा गांधींच्या सेवेचे मोजमाप आणीबाणी लादण्यावरून करता येत नाही. हेच अडवाणींनाही लागू होते,' असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसची प्रतिक्रिया:

थरूर यांच्या वक्तव्यापासून काँग्रेसने स्वतःला दूर ठेवले असून, 'हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांनी अलीकडे दिलेल्या अनेक वक्तव्यांचा पक्षाशी संबंध नाही,' असे म्हटले आहे.