बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर आता त्यांनी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. दोघांनी संवाद सुरू केला असून, नातं वाचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे.
बॅडमिंटन विश्वातील प्रसिद्ध जोडपं सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून वैवाहिक जीवनातील मतभेदांमुळे चर्चेत आहे. अवघ्या काही आठवड्यांपूर्वी या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजवली होती. मात्र आता या जोडप्याने पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिल्याने नव्या चर्चांना ऊत मिळाला आहे.
दोघे परत आले एकत्र
सायना आणि कश्यप हे दोघेही भारतीय बॅडमिंटनचे दिग्गज खेळाडू असून, २०१२ सालापासून त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. २०१९ मध्ये त्यांनी विवाह केला. गेल्या ११ वर्षांच्या या नात्यात त्यांनी एकमेकांच्या करिअरमुळे एकत्र आले, प्रवास केला आणि भारतीय बॅडमिंटनला नवे यश मिळवून दिलं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. या दुराव्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले. चाहत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि दोघांनी वेगळे होणं ही "एक युगाची समाप्ती" असल्याची भावना व्यक्त केली. मात्र, या घटस्फोटाच्या घोषणेनंतर अवघ्या काही आठवड्यांतच पुन्हा एकत्र येण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
दोघांचा संवाद झाला सुरु
सूत्रांच्या माहितीनुसार, सायना आणि कश्यप यांनी पुन्हा संवाद सुरू केला असून, नातं वाचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जातं. त्यांचे नजीकचे मित्र आणि नातेवाईक देखील दोघांना समजूतदारपणा दाखवण्याचा सल्ला देत आहेत. दोघांच्याही वैयक्तिक आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी ते एकमेकांमधील संवादावर भर देत आहेत.
बॅडमिंटनपटू म्हणून त्यांनी जे काही मिळवलं आहे, ते केवळ वैयक्तिक नव्हे तर एकत्रित संघर्ष आणि समर्पणातून मिळालेलं यश आहे. त्यामुळे त्यांच्या नात्याला पुन्हा एक संधी मिळाली, तर ते दोघंही मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर होऊन आपल्या खेळावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करू शकतील, असा विश्वास त्यांच्या चाहत्यांना आहे. सध्या या दोघांनी याबाबत कोणतीही अधिकृत टिप्पणी दिलेली नाही.
