मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. मंगळवारी दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधींनी एका महिला पोलिसाला धक्का दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.
BJP Attacks Rahul Gandhi: मंगळवारी दिल्लीतील (Delhi) जंतरमंतरजवळील (Jantar Mantar) अशोका रोडवर आंदोलन सुरू होतं. यावेळी राहुल गांधी यांनी एका महिला पोलिसाला धक्का दिल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे. राहुल गांधींनी या महिला पोलिसाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि हाताने बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला, असा दावा भाजपने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत केला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी लिहिलंय, 'रील बनवण्याच्या नादात राहुल गांधींनी एका महिला पोलिसाला धक्का देण्याचा प्रयत्न केला.' भाजपचे दुसरे प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही राहुल गांधींवर निशाणा साधला. व्हिडिओमध्ये राहुल गांधी जाणीवपूर्वक महिला पोलिसाला हात लावताना दिसत आहेत, असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षनेत्यासारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीकडून अशा वागणुकीची अपेक्षा नाही, असं म्हणत त्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. भाजप नेते तजिंदर बग्गा यांनीही या घटनेवर कडक शब्दांत टीका केली. कोणतंही राजकीय पद तुम्हाला एखाद्या महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा अधिकार देत नाही, असं ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
आंदोलनामुळे दिल्लीत तणाव
मतचोरीचा आरोप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Chief Election Commissioner Gyanesh Kumar) यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी बुधवारी दिल्लीत जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पोलीस एका महिला आंदोलकाला बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू झाली. याच घटनेवरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेकजण राहुल गांधींच्या वागणुकीवर संताप व्यक्त करत आहेत.
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक
बुधवारीही दिल्लीत इंडिया (INDIA) आघाडीच्या खासदारांच्या आंदोलनामुळे दिवसभर तणावाचं वातावरण होतं. आदल्या दिवशीही निवडणूक आयुक्तांची भेट घेण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाचे खासदार आठ तास धरणे आंदोलनाला बसले होते. बुधवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. तिथून सर्वजण बसने जंतरमंतरकडे निघाले. जनपथवरून मोर्चा पुढे जात असताना काही नेते हातात तिरंगा घेऊन बसच्या टपावरही चढले. पोलिसांनी या बसेस अडवल्यानंतर परिस्थिती आणखीनच चिघळली. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, त्यांच्या बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना जबरदस्तीने बाजूला करत ताब्यात घेतलं. या आंदोलनात काँग्रेससोबतच तृणमूल काँग्रेस, सीपीआय(एम), सीपीआय, आरजेडी, आययूएमएल यांसारख्या अनेक पक्षांचे खासदार सहभागी झाले होते. मात्र, समाजवादी पक्षाचे खासदार या आंदोलनात दिसले नाहीत.
अधिक बातम्यांसाठी एशियानेट न्यूज मराठीच्या व्हॉट्सॲप चॅनेलला फॉलो करा, येथे क्लिक करा.
