अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत नारायणगावात काळे झेंडे दाखवण्यात आले. तर, श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडेंनी मराठ्यांनी आरक्षण मागितले पाहिजे का असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच, बेंगळुरूमध्ये एका तरुणीवर ऑटोचालकाने बलात्कार केल्याची घटना घडली.
जम्मू-काश्मीरातील विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती न करता अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची रणनीती आखली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी काश्मीर खोऱ्यातील 8 ते 10 अपक्ष उमेदवारांसोबत निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
यूपीच्या बुलंदशहरमध्ये रविवारी एका भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. बस आणि मॅक्स पिकअपची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून टीएमसी खासदार सुखेंदू शेखर रे यांना कोलकाता पोलिसांनी समन्स बजावले आहे. रे यांनी तपासावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या नाशिकमधील शांतता रॅलीवरून छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. जरांगेंकडे आता कोणी लक्ष देत नाही असा दावा भुजबळांनी केला आहे. तसेच, जरांगेंनी 288 जागा लढवाव्यात आणि मुख्यमंत्री व्हावे असा टोलाही त्यांनी लगावला.
युनिसेफने मध्य प्रदेशातील किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या आरोग्यास प्रोत्साहनासाठी 19 लाख मुलींच्या खात्यात 57.18 कोटी जमा केले.