विंचिया तालुक्यातील ओरी गावचे बलवंतभाई राघवानी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या चॅम्पियनने अवघ्या ३० मिनिटांत तब्बल २८ लाडू फस्त करत आपलं विजेतेपद कायम राखलं.
मुंबई : गुजरातच्या प्रसिद्ध तरणेतर मेळ्याची रंगत सध्या शिगेला पोहोचली आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्यात भरणाऱ्या या मेळ्यात 'ग्रामीण ऑलिम्पिक' अंतर्गत लाडू खाण्याची स्पर्धा पार पडली. ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. गुजरात क्रीडा प्राधिकरण, क्रीडा, युवक आणि सांस्कृतिक कार्यक्रम विभाग आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्र यांनी मिळून या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यात २५ ते ७५ वयोगटातील २८ स्पर्धकांनी भाग घेतला.
स्पर्धकांना ३० मिनिटांची वेळ दिली होती. या वेळेत डाळीसोबत बेसनाचे जास्तीत जास्त गोड लाडू खायचे होते. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पहिली १५ मिनिटं खूप महत्त्वाची ठरली. कारण सरासरी १५ लाडू खाल्ल्यानंतर अनेक स्पर्धक बाद झाले.
त्यानंतर खरी चुरस उरलेल्या पाच फायनलिस्टमध्ये रंगली. २२, २४ आणि २६ लाडूंचा टप्पा पार करत हे स्पर्धक पुढे जात होते, तसतसा लोकांचा उत्साह आणखी वाढत होता.
अखेर विंचिया तालुक्यातील ओरी गावचे बलवंतभाई राघवानी यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. या चॅम्पियनने अवघ्या ३० मिनिटांत तब्बल २८ लाडू फस्त करत आपलं विजेतेपद कायम राखलं.
स्पर्धेच्या नियमांनुसार, राघवानी यांना एकमेव विजेता घोषित करण्यात आलं आणि त्यांना २,००० रुपयांचं रोख बक्षीस देण्यात आलं.
जिल्हाधिकारी जी. एच. सोळंकी यांनी लोकांच्या या उत्साही सहभागाचं कौतुक केलं. तरणेतर मेळा हा या भागाचा सांस्कृतिक वारसा, आनंद आणि एकतेचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले.
या कार्यक्रमाला सहाय्यक पोलीस अधीक्षक वैदिका बिहानी, प्रांत अधिकारी के. एन. कछा, जिल्हा क्रीडा विकास अधिकारी पार्थ चौहान आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.


