Menopause Clinic Maharashtra : महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासकीय रुग्णालये व शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू केली आहेत. 

Menopause Clinic Maharashtra : महाराष्ट्रात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये आणि शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, महिलांच्या आयुष्यातील संवेदनशील टप्प्याला वैद्यकीय आधार देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मेनोपॉज काळातील समस्या आता दुर्लक्षित राहणार नाहीत

राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा टप्पा असून या काळात शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोनल असंतुलन, झोपेचे विकार, नैराश्य तसेच हाडांचे आजार वाढण्याची शक्यता असते. मात्र आतापर्यंत या समस्यांकडे दुर्लक्ष होत होते. हीच गरज ओळखून शासनाने मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला आहे.

एकाच ठिकाणी उपचार, तपासणी आणि समुपदेशन

या क्लिनिकच्या माध्यमातून महिलांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सुरू झालेल्या या उपक्रमाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, महिलांकडून समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

महिलांचे आरोग्य मजबूत तर राज्य सक्षम

मेनोपॉज हा आजार नसून तो महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. मात्र या काळात योग्य वैद्यकीय आणि मानसिक आधार मिळणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक महिलेला सन्मानपूर्वक उपचार मिळावा यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले. महिलांचे आरोग्य सुदृढ झाले, तर कुटुंब, समाज आणि राज्य अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.