MP Harda Factory Blast : फटाके कारखान्याच्या मालकासह तिघांना अटक, स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू

| Published : Feb 07 2024, 11:56 AM IST / Updated: Feb 07 2024, 12:27 PM IST

harda pathaka

सार

MP Harda Factory Blast : मध्य प्रदेशातील हरदा येथे मंगळवारी (6 फेब्रुवारी) फटाक्यांच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

MP Harda Factory Blast : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा (Harda) येथे मंगळवारी (6 फेब्रुवारी 2024) फटाक्यांच्या कारखान्यामध्ये (Firecracker Factory) झालेल्या भीषण स्फोट (Massive Explosion) प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. 

यामध्ये कारखान्याचा मालक राजेश अग्रवाल (Rajesh Agrawal) याचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेले तिघेही जण दिल्लीमध्ये पळ काढण्याच्या मार्गावर होते. पण त्यापूर्वी पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान या दुर्घटनेमध्ये 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे आणि 174 लोक जखमी झाले आहेत.

राजेश अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफिक खान अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजीव कांचन यांनी दिली आहे.

35 जखमींची प्रकृती गंभीर

हरदा येथील मगरधा रोडवरील बैरागढ परिसरामध्ये मंगळवारी (6 फेब्रुवारी) भीषण स्फोट झाला. हे ठिकाण भोपाळ (Bhopal) शहरापासून 150 किमी अंतरावर आहे. नर्मदापूरमचे आयुक्त पवन शर्मा यांनी सांगितले की, “दुर्घटनेमध्ये 174 जण जखमी झाले आहेत. यापैकी 35 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना भोपाळ आणि होशंगाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. 140 जखमींवर हरदा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत”.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जखमींची घेतली भेट 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची भेट घेतली. मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “राज्य सरकार हरदा दुर्घटनेतील पीडितांच्या पाठीशी आहे. जखमींच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”

आणखी वाचा 

Madhya Pradesh : हरदा दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना PMNRFमधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर

'संपूर्ण गांधी कुटुंब मला ते बिस्किट खायला लावू शकले नाहीत', आसामच्या मुख्यमंत्र्यांनी VIRAL VIDEOवरून साधला निशाणा

‘सपने नहीं हकीकत बुनते हैं...मोदी की गॅरंटी’ निवडणूक प्रचाराअंतर्गत भाजपकडून 5 व्हिडीओ लाँच Watch Video