सार

भारतात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात 18 वर्षांवरील भारतातील नागरिकांना मतदान करण्याचा हक्क असतो. पण अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार का? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर....

Lok Sabha Election 2024 :  भारतात लोकसभा निवडणुकीच्या तारखा गेल्या काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने (Election Commision) जाहीर केल्या आहेत. अशातच राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पण अमेरिकेसह (US) परदेशातील अन्य ठिकाणी राहणाऱ्या भारतीय नागरिकांना निवडणुकीत मतदान करता येते का? मतदानासाठीचे नियम काय आहेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

भारतात होणाऱ्या निवडणुकीसाठी परदेशातील भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क असतो, जो पर्यंत ते भारतीय नागरिकत्व सोडत नाहीत. वर्ष 2010 पर्यंत दुसऱ्या देशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांना भारतात मतदान करण्याचा अधिकार नव्हता. पण आता परदेशातील भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा अधिकार असून त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

एनआरआय (NRI) व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार
वर्ष 2010 आधी परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यावेळी नियम असा होता की, एखादा भारतीय सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ परदेशात राहिल्यास त्याचे नाव मतदार यादीतून (Voter List) हटवले जायचे. यानंतर वर्ष 2010 मध्ये रिप्रेजेंटेशन ऑफ पीपुल्स अ‍ॅक्टमध्ये (Representation of the People Act) सुधारणा करण्यात आल्यानंतर परदेशातील भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला.

मतदानाचा अधिकार मिळाला असला तरीही एक समस्या आहे. रिप्रेंजेटशन ऑफ पीपुल्स अ‍ॅक्टमधील कलम 20A नुसार, मतदान करण्यासाठी परदेशातील भारतीयांना मायदेशात यावे लागणार. यामुळेच बहुतांश एनआरआय व्यक्तींना मतदान करता येत नाही.

मतदार यादीत अशा पद्धतीने नाव दाखल करता येईल
शिक्षण, नोकरी किंवा अन्य एखाद्या कारणास्तव परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकाला आपले मतदार यादीत नाव दाखल करता येऊ शकते. वयाच्या 18 व्या वर्षावरील कोणताही एनआरआय व्यक्ती फॉर्म 6A भरून मतदार यादीत आपले नाव नोंदवू शकतो. फॉर्म 6A (Form 6A) तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येऊ शकतो. याशिवाय परदेशात भारतीय दूतवासाच्या कार्यालयात फॉर्म 6A मोफत दिला जातो.

एनआरआय व्यक्ती तेव्हाच मतदार यादीत नाव नोंदवू शकतो जेव्हा त्याचे निवासस्थान भारतातील आहे. एनआरआय व्यक्ती फॉर्म 6A भरल्यानंतर संबंधित इलेक्टोरल रजिस्ट्रेशन अधिकाऱ्याला पोस्टाच्या माध्यमातून पाठवू शकतो. यानंतर एनआरआय व्यक्तीला भारतात मतदान करण्याची परवानगी मिळते. पण सोबत पासपोर्ट असणे अत्यावश्यक आहे.

ऑनलाइन मतदान करता येऊ शकते?

  • परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मतदान करण्याची सुविधा नाही.
  • केवळ मतदानाच्या ड्युटीवर असणारे कर्मचारी, सैन्यातील जवान किंवा परदेशात काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक किंवा पोस्टाच्या माध्यमातून मदतान करण्यास परवानगी आहे. याला सर्विस वोटर्स (Service Voters) असे म्हटले जाते.
  • सर्विस वोटर्सला सर्वप्रथम पोस्टल बॅलेट पाठवले जाते. त्यानंतर पोस्टल बॅलेट डाउनलोड करून मत देऊ शकतात. यानंतर इमेल किंवा पोस्टाच्या माध्यमातून रिटर्निंग अधिकाऱ्यला पाठवू शकतात.

जगभरात किती एनआरआय आहेत?
परराष्ट्र मंत्रालयानुसार, जगभरात 1.36 कोटी भारतीय आहेत. युएईमध्ये (UAE) 34.19 लाख भारतीय राहतात. अमेरिकेत 12.80 लाख भारतीय आहेत. याशिवाय निवडणूक आयोगानुसार, जवळजवळ सव्वा लाख नोंदणीकृत भारतीय आहेत.

आणखी वाचा : 

Loksabha Election : निवडणूक प्रचारात कोणत्या चुका पक्ष आणि उमेदवारांना महागात पडू शकतात? आचारसंहितेचे नियम जाणून घ्या

Lok Sabha Election 2024 : बेघर मतदारांनाही करता येणार मतदान, निवडणूक आयोगाने सांगितला सोपा पर्याय

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे NDA सोबत जाणार? उद्धव ठाकरेंना घरातूनच मिळणार आव्हान