
कुर्ला चिराग नगरमध्ये दरड कोसळली, 6 संशयित मृतदेह
मुंबईतील कुर्ला पश्चिमच्या चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीत बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. चाळीचा काही भाग कोसळून त्याचा ढिगारा जवळच्या दोन ते तीन खोल्यांवर पडला. या दुर्घटनेत 6 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, 6 संशयित मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोन जखमींना कुर्ला भाभा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.पहाटे 3 वाजून 48 मिनिटांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली आणि 4 वाजून 32 मिनिटांनी दुर्घटनेला लेव्हल-2 घोषित करण्यात आलं. मुंबई अग्निशमन दल, NDRF, पोलीस आणि BMCची पथकं घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. विशेष बचाव उपकरणांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचं काम सुरू असून, सुमारे 50 BMC कर्मचारी आणि NDRFचे जवान सहभागी आहेत.दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश धाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध बचाव पथकांकडून सुरू आहे.