Man Harasses Woman In Kerala Bus: केरळमध्ये एका महिलेने सार्वजनिक बसमध्ये झालेल्या छेडछाडीला धाडसाने तोंड दिले. तिने आरोपीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याला लोकांसमोर आणले, मात्र इतर प्रवासी बघ्याच्या भूमिकेत राहिले. 

तिरुवनंतपुरम: केरळमधील एका महिलेनं सार्वजनिक बसमध्ये स्वतःवर झालेल्या छेडछाडीविरोधात थेट पावले उचलली. बसमध्ये प्रवास करताना एका प्रवाशानं तिच्याशी गैरवर्तन केल्यानंतर तिनं धाडस करून त्याचा व्हिडिओ टिपला आणि त्याच बसमध्ये त्या आरोपीला लोकांसमोरच सामोरे गेली. विशेष म्हणजे, या दरम्यान इतर प्रवासी मुकाट्याने बघ्याची भूमिका घेत बसले होते.

हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पोस्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप

हा व्हिडिओ Bharat Vision या फेसबुक पेजवर पोस्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या महिलेला धैर्याबद्दल कौतुक केले, पण त्याचवेळी प्रवाशांच्या निष्क्रियतेवरही टीका केली. व्हिडिओमध्ये आरोपी व्यक्ती शांतपणे आणि बिनधास्तपणे हात हलवताना दिसतो, ज्यावरून लोकांचा असा अंदाज आहे की तो काही पहिल्यांदाच असे करत नव्हता.

View post on Instagram

एका वापरकर्त्याने लिहिले, “पाहा कसा थंडपणे हात वर करतोय! अशा व्यक्तीला पोलिसांनी पकडून थेट जेलमध्ये टाकायला हवं. पुरावा स्पष्टच आहे.” या घटनेनंतर महिलांना न्याय मिळवणं किती कठीण आहे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

महिलांनी न्यायासाठी लढताना येणाऱ्या अडचणी

अनेकांनी टिप्पणी करताना सांगितले की भारतात अशा छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये तक्रार दाखल करणे आणि न्याय मिळवणे अत्यंत अवघड असते. म्हणूनच काही महिला गुन्हेगारांना लगेच गाडीतून उतरवतात पण पोलिसात जात नाहीत, कारण त्यांना सामाजिक कलंक आणि सरकारी प्रक्रियेची भीती वाटते.

एका वापरकर्त्याने लिहिले, “ऑनलाइन लोक जे बोलतात आणि प्रत्यक्षात महिलांना जे सहन करावं लागतं, त्यात खूप अंतर आहे. म्हणूनच अशा प्रसंगी महिलांनी सगळं रेकॉर्ड ठेवावं.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं, “बसमधले लोक फक्त महिला ओरडतेय हेच पाहत होते, कोणी प्रत्यक्षात छेडछाड होत आहे हे पाहिलं नाही. तिच्याकडे व्हिडिओ होता, त्यामुळे ती जर कंडक्टरला सांगून पोलिसांकडे गेली असती तर हा माणूस अडकला असता.”

पुराव्याच्या नावाखाली वेदना सहन

आणखी एका वापरकर्त्याने खंत व्यक्त करत म्हटलं, “या महिलेने पुरावा मिळावा म्हणून काही मिनिटं गप्प बसून हे सगळं सहन केलं, हेच दुःखद आहे. भारतात पुरावा नसेल तर उलट महिलेलाच दोष दिला जातो. तिने बसमध्ये बसण्याची जागा का निवडली, कपडे कसे होते, अशा प्रश्नांनी तिची चौकशी केली जाते.”

व्हिडिओ झालाच निर्णायक पुरावा

या महिलेने केलेले धाडस आणि व्हिडिओ रेकॉर्ड हे तिचं सर्वात मोठं शस्त्र ठरलं. अनेकांनी म्हणलं की व्हिडिओ नसता, तर ही महिला तक्रार दिल्यानंतर समाजाकडूनच अपमान आणि शंकेला सामोरी गेली असती. “सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे जर महिलेनं व्हिडिओशिवाय तक्रार केली असती, तर तिच्यावरच शंका घेतली गेली असती,” अशी टिप्पणी एका वापरकर्त्याने केली. काहींनी म्हटलं की जरी आता तिच्याकडे पुरावा आहे, तरीही इंटरनेटवर काही लोक तिला “लवकर प्रतिक्रिया दिली का नाही” असं म्हणत दोष देतील.

न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

एका वापरकर्त्याने “सवाद प्रकरणा”चा संदर्भ देत म्हटलं, “कसं काय कोणी इतकं थंडपणे आणि निर्धास्तपणे अश्लील वर्तन करू शकतं, आणि तेही सार्वजनिक ठिकाणी? असं वाटतं की भारतात अशा नीच कृत्यांनंतरही शिक्षा मिळत नाही म्हणूनच हे लोक निर्धास्त आहेत. केरळसारख्या राज्यातदेखील असे प्रकार होणं शर्मनाक आहे.”

जरी या व्हिडिओमध्ये पूर्ण पुरावा आहे, तरीही महिलेनं औपचारिक तक्रार दाखल केली का, हे स्पष्ट झालेलं नाही. सोशल मीडियावर अनेकांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.

एका वापरकर्त्याने तीव्र व्यंगात्मक भाषेत लिहिलं, “लोक म्हणतात महिलांना भारतात खूप सोपं आयुष्य आहे, पण हाच व्हिडिओ दाखवतो की रोज ९९ टक्के महिलांना १ टक्के पुरुषांकडून छेडछाड, चुकीची नजर आणि अश्लील वर्तनाला सामोरे जावं लागतं.”