केंद्र सरकारकडून आयटीआर रिटर्न भरणाऱ्यांसाठी दिलासा देण्यात आला आहे. करत्यांना आयटीआर रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) अद्याप भरला नसेल, तर काही करदात्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने विशिष्ट श्रेणीतील करदात्यांसाठी आयकर रिटर्न भरण्याची मुदतवाढ केली आहे. खरंतर, करदात्यांसाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे.

'या' करदात्यांना मिळाला मुदतवाढीचा लाभ

नवीन नियमांनुसार, व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असण्यासह ज्यांच्या खात्यांचे टॅक्स ऑडिट आवश्यक नाही अशा करदात्यांना आता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत आयकर रिटर्न भरता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ITR-3 आणि ITR-4 भरणारे पात्र करदात्यांसह काही ट्रस्ट्सचा समावेश आहे.

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी अंतिम तारीख बदललेली नाही

तुम्ही नोकरी करणारे कर्मचारी असाल आणि ITR-1 किंवा ITR-2 भरत असाल तर तुमच्यासाठी अंतिम मुदतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशा करदात्यांना 31 जुलै 2026 पर्यंतच आयकर रिटर्न दाखल करावा लागणार आहे. निर्धारित मुदतीनंतर रिटर्न भरल्यास विलंब शुल्क (Late Fee), व्याज आणि इतर करासंबंधित नियम लागू होऊ शकतात.

सरकारने मुदतवाढ का दिली?

नॉन-ऑडिट व्यवसाय करणारे करदाता आणि काही ट्रस्ट्सना आवश्यक कागदपत्रे व आर्थिक नोंदी तयार करण्यासाठी अधिक वेळ मिळण्याच्या उद्देशाने सरकारने ही मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे रिटर्न भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.

उशिरा ITR भरल्यास काय?

तुमच्या श्रेणीसाठी निश्चित केलेली अंतिम तारीख संपल्यानंतर आयकर रिटर्न भरल्यास विलंब शुल्क, व्याज तसेच काही करसवलतीचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आपल्या श्रेणीनुसार निर्धारित मुदतीपूर्वीच आयकर रिटर्न दाखल करावा.