ISRO to Launch Indias Heaviest Satellite today : भारतीय भूमीवरून प्रक्षेपित होणारा सर्वात वजनदार उपग्रह, इस्रो-निर्मित 'CMS-03' संचार उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटी मोजणी सुरू झाली आहे.
ISRO to Launch Indias Heaviest Satellite today : भारतीय भूमीवरून प्रक्षेपित होणारा सर्वात वजनदार उपग्रह, इस्रो-निर्मित 'CMS-03' संचार उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटी मोजणी सुरू झाली आहे. हा उपग्रह रविवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून सायंकाळी ५.२६ वाजता अवकाशात झेपावेल.
हा ४,४१० किलो वजनाचा उपग्रह आहे. 'बाहुबली' म्हणून ओळखले जाणारे LVM3-M5 रॉकेट, जे जड उपग्रह वाहून नेण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे, ते या संचार उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये (GTO) स्थापित करेल.
रॉकेटच्या असेंब्लीचे काम पूर्ण झाले असून, त्याला श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या लॉन्च पॅडवर पाठवण्यात आले आहे. प्रक्षेपणापूर्वीची बहुतेक कामे पूर्ण झाली आहेत, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) म्हटले आहे.
सुमारे ४३.५ मीटर उंचीचे LVM3 रॉकेट ४ हजार किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता ठेवते.
गयाना येथून प्रक्षेपित झाला होता वजनदार उपग्रह
यापूर्वी ५ डिसेंबर २०१८ रोजी इस्रोने आपला सर्वात वजनदार, म्हणजेच ५,८५४ किलो वजनाचा GSAT-11 उपग्रह प्रक्षेपित केला होता. पण तो फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपित करण्यात आला होता. तो इस्रोचा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह आहे. मात्र, भारतातून ४००० किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आता CMS-03 उपग्रह वाहून नेणाऱ्या LVM3-M5 रॉकेटचे हे पाचवे उड्डाण आहे. चांद्रयान-३ मोहिमेतही LVM3 रॉकेटचा वापर करण्यात आला होता.
CMS-03 उपग्रहाची वैशिष्ट्ये
CMS-03 उपग्रह सागरी क्षेत्रांना पूर्वीच्या उपग्रहांपेक्षा अधिक अचूक दळणवळण सेवा प्रदान करेल. तो युद्धनौका, पाणबुड्या, लढाऊ विमाने आणि सागरी किनाऱ्यावरील नियंत्रण केंद्रांशी संपर्क साधेल. हा उपग्रह विशेषतः नौदलासाठी तयार करण्यात आला आहे.


