ISRO PSLV C62 Mission Faces Setback : ISRO चे PSLV-C62 रॉकेट प्रक्षेपण पूर्णपणे यशस्वी झाले नाही. 'अन्वेषा' सह इतर पेलोड घेऊन जाणाऱ्या या अंतराळ प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात PSLV ला मोठा धक्का बसला.
ISRO PSLV C62 Mission Faces Setback : ISRO चे सर्वात विश्वासार्ह प्रक्षेपण वाहन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या PSLV च्या इतिहासातील हा सलग दुसरा धक्का आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या लॉन्च पॅड क्रमांक एकवरून आज सकाळी 10.17 वाजता अवकाशात झेपावलेल्या PSLV-C62 रॉकेट प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात अनिश्चितता निर्माण झाली. मे २०२५ मध्ये झालेले PSLV चे मागील प्रक्षेपण देखील अयशस्वी ठरले होते. आजच्या मोहिमेत 'अन्वेषा' उपग्रहासह 16 पेलोड यशस्वीरित्या तैनात करता आले की नाही, याबाबत इस्रोने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
PSLV ला सलग अपयश
ISRO च्या PSLV रॉकेटला सलग दुसऱ्या प्रक्षेपणात अपयशाचा सामना करावा लागला आहे. श्रीहरिकोटा येथून उड्डाण घेतल्यानंतर रॉकेटचा तिसरा टप्पा वेगळा झाल्यावर तांत्रिक समस्या निर्माण झाली. यामुळे रॉकेटचा मार्ग बदलला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी दिली. रॉकेटमधून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण केले जात असून, अधिक माहितीचा अभ्यास करून ती जाहीर केली जाईल, असे इस्रो अध्यक्षांनी सांगितले. मागील वर्षी झालेल्या PSLV-C61 प्रक्षेपणातही ISRO ला अशाच समस्येचा सामना करावा लागला होता. त्यावेळी PSLV रॉकेटमध्ये नेमकी कोणती तांत्रिक समस्या आली होती, याची माहिती ISRO ने जाहीर केली नव्हती.


