- Home
- India
- मंगळसूत्र, नथ, कानातले... आता बास! या गावात महिलांसाठी नवा नियम लागू, अन्यथा 50 हजारांचा दंड!
मंगळसूत्र, नथ, कानातले... आता बास! या गावात महिलांसाठी नवा नियम लागू, अन्यथा 50 हजारांचा दंड!
Indian Village Limits Women Gold Ornaments : उत्तराखंडच्या कंदार गावात महिलांना कार्यक्रमांमध्ये तीनपेक्षा जास्त सोन्याचे दागिने घालण्यावर बंदी घातली आहे. फक्त मंगळसूत्र, नथ आणि कानातले घालता येणार आहेत. नियम मोडल्यास ५०,००० रुपयांचा दंड आकारला जाईल.

सामाजिक दबाव कमी करण्यासाठी गावात महिलांच्या दागिन्यांवर मर्यादा
उत्तराखंडच्या चक्राता भागातील कंदार या शांत आदिवासी गावात सोनं अचानक चर्चेचा आणि वादाचा विषय बनलं आहे. गाव पंचायतीने एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यामुळे महिलांना लग्न आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये फक्त तीनच सोन्याचे दागिने घालता येतील: एक मंगळसूत्र, एक नथ आणि कानातल्यांची जोडी.
यापेक्षा जास्त दागिने घातल्यास ५०,००० रुपयांचा दंड भरावा लागेल.
हा निर्णय विचित्र वाटत असला तरी, यामागे एक मोठी चिंता आहे. श्रीमंती दाखवण्याचा वाढता दबाव आणि त्यामुळे गरीब कुटुंबांवर येणारा भार, हे या निर्णयामागील खरं कारण आहे.
'आम्ही साधं जीवन जगतो. हा निर्णय योग्य आहे'
८० वर्षांच्या उमा देवी यांच्यासाठी हा नवीन नियम निर्बंधाऐवजी दिलासा देणारा आहे.
त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, "आमच्यापैकी बहुतेक जण गरीब आहेत आणि साधं जीवन जगतात. मला वाटतं की पंचायतीने योग्य निर्णय घेतला आहे."
गावकऱ्यांच्या मते, जड सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड सुमारे दोन दशकांपूर्वी सुरू झाला, जेव्हा गावातील काही पुरुषांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या. आर्थिक परिस्थिती सुधारल्याने एक नवीन सामाजिक स्पर्धा सुरू झाली. वधू आणि पाहुणे १८०-२०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे सेट घालू लागले, ज्यांची किंमत आता २० लाखांपेक्षा जास्त आहे.
लवकरच, महागडे दागिने प्रतिष्ठेचं प्रतीक बनले आणि ज्यांना ते परवडत नव्हते, त्यांना कमीपणा वाटू लागला.
एका गावकऱ्याने सांगितले, "घरातील महिलांनी किती सोनं घातलं आहे, यावरून लोक कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा अंदाज लावू लागले. ही परंपरा न राहता फक्त दिखावा बनली."
'सोन्यावर बंदी, तर व्हिस्कीवर का नाही?'
ही चर्चा फक्त दागिन्यांपुरती मर्यादित नाही.
तुळसा देवी, आणखी एक रहिवासी म्हणाल्या की, पंचायतीने आता सामाजिक कार्यक्रमांमध्ये महागड्या विदेशी दारूवर बंदी घालण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
"पूर्वी आम्ही लग्नसमारंभात स्थानिक पातळीवर थोडीशी दारू बनवत असू. आता प्रत्येकाला ब्रँडेड व्हिस्की हवी असते. ही एक प्रतिष्ठेची बाब आणि ओझं बनलं आहे," असं त्या म्हणाल्या.
'सामाजिक सुधारणेची ही फक्त सुरुवात आहे'
हा ठराव तयार करण्यात मदत करणाऱ्या पंचायत सदस्यांपैकी एक, तिलक सिंह म्हणाले की, गावातील जीवनात साधेपणा आणि समानता परत आणण्याचा हा उद्देश आहे.
"ही फक्त सुरुवात आहे. आम्हाला अनावश्यक स्पर्धा थांबवून साधेपणाला प्रोत्साहन द्यायचे आहे. असे आणखी सुधारणावादी निर्णय घेतले जातील," असं ते म्हणाले.

