सार

भारत आणि चीन सीमेवर तैनात असलेल्या २० जवानांनी चिनी भाषा शिकून त्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. लडाखच्या डेपसांग आणि देमचोक सीमेवर सैन्यमाघारी जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि लवकरच भारत सरकार याबाबत अधिकृत घोषणा करेल.

अहमदाबाद: भारत आणि चीन सीमेवर तैनात असलेल्या २० जवानांनी चिनी भाषा शिकून त्यात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. भारतीय सैन्याच्या सहकार्याने, चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांना ध्वज बैठका, नियमित संवाद, सैन्याच्या वाटाघाटींसाठी चिनी भाषा आवश्यक असल्याने भाषा शिकवण्यात आली. तसेच सीमेपलीकडील सैनिकांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक कौशल्ये असावीत यासाठी हा निर्णय घेण्यात आला. पूर्व कमांडरचे २० जवान गुजरातमधील गांधीनगरच्या राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात चीनमध्ये जास्त बोलली जाणारी मँडेरिन भाषा शिकले.

भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांकडून सैन्यमाघारी पूर्ण
लडाख: भारत-चीनमध्ये झालेल्या अलीकडील करारानुसार लडाखच्या डेपसांग आणि देमचोक सीमेवर सैन्यमाघारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. लवकरच भारत सरकार याबाबत अधिकृत घोषणा करेल, असे सूत्रांनी सोमवारी सांगितले. अलीकडेच दोन्ही देशांनी सैन्यमाघारीचा करार केला होता, त्यानुसार २५ ऑक्टोबर रोजी सैन्यमाघारी सुरू झाली होती आणि चिनी सैनिकांनी तंबू हटवण्यास सुरुवात केली होती. २८-२९ ऑगस्टपर्यंत माघारी पूर्ण होईल, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले होते.

'त्यानुसार सैन्यमाघारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. अधिकृत घोषणा कधीही होऊ शकते. त्यानंतर करारानुसार दोन्ही देशांचे जवान सीमेवर संयुक्त गस्त घालतील,' असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. २०२० मध्ये लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक झाली होती आणि २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर लडाखच्या ७ सीमा केंद्रांवर दोन्ही देशांचे सैनिक तळ ठोकून होते. परंतु नंतर शांतता चर्चा झाल्या आणि ५ सीमा केंद्रांवरून सैन्यमाघारी झाली. डेपसांग आणि देमचोकवरून मात्र झाली नव्हती. आता तिथेही सैन्यमाघारी होत असून, सीमेवर वर्षानुवर्षे शांतता प्रस्थापित होण्याची आशा आहे.