सार

Smile Scheme : केंद्र सरकारने (Central Government) अयोध्यापासून ते तिरुवनंतपुरमपर्यंत ही 30 शहरं 2026 पर्यंत भिकारीमुक्त करण्याची योजना सुरू केली आहे.

Smile Scheme :  भारत देश भिकारीमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) मोठा पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारने अयोध्या (Ayodhya) ते तिरुवनंतपुरमपर्यंत (Thiruvananthapuram) अशी एकूण 30 शहरं वर्ष 2026पर्यंत भिकारीमुक्त (Beggary Free India) करण्यासाठी विशेष योजना राबवणार आहे. 

याकरिता सरकारकडून एक व्यापक स्वरुपातील सर्वेक्षण आणि पुनर्वसन उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रौढ वर्गामध्ये मोडणारे भिकारी, विशेषत: महिला आणि मुलांकरिता पुनर्वसन कार्यक्रम राबवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

स्माइल योजना

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या नेतृत्वांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वर्ष 2026पर्यंत या शहरांमध्ये भीक मागण्याचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाणारे ठिकाण शोधणे आणि भीक मागणाऱ्यांच्या कल्याणासाठी जिल्हा व महापालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने काम करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून हे लोक भीक मागणार नाहीत. यासाठी 'स्माइल' SMILE (Support for Marginalised Individuals for Livelihood and Enterprises) नावाची योजना चालवण्यात येईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपेक्षित लोकांची मदत केली जाईल.

30 शहरांमध्ये राबवण्यात येणार SMILE योजना

देशाच्या उत्तरेकडील अयोध्येपासून ते पूर्वेकडील गुवाहाटीपर्यंत आणि पश्चिमेकडील त्र्यंबकेश्वरपासून ते दक्षिणेतील तिरुवनंतपुरमपर्यंत एकूण 30 शहरांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटनाचे महत्त्व या आधारावर संबंधित शहरांची निवड करण्यात आली आहे. याकरिता मंत्रालयातर्फे फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत एक राष्ट्रीय संकेतस्थळ आणि मोबाइल ॲप (Mobile App) सुरू करण्यात येणार आहे.

SMILE योजनेअंतर्गत 25 शहरांमधून काम सुरू करण्यात आले आहे. कांगडा, कटक, उदयपूर आणि कुशीनगर येथील संमती प्रलंबित आहे. तर सांची या धार्मिक स्थळ परिसरामध्ये भीक मागणाऱ्यांचे एकही प्रकरण नोंदवले गेले नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे आणखी एका शहराचा विचार केला जात आहे. दुसरीकडे कोझिकोड, विजयवाडा, मदुराई आणि म्हैसूर या शहरांमधील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

स्माइल (SMILE) योजनेअंतर्गत भीक मागणाऱ्या लोकांची ओळख पटवली जाईल. यानंतर त्यांचे पुनर्वसन केले जाईल. या लोकांमधील कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील. भिकाऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेणे हा या योजनेचा (Smile Scheme) उद्देश आहे. सर्वसमावेशक आणि न्याय्य समाज निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा (Central Government) प्रयत्न आहे, ज्याद्वारे भिकारीमुक्त भारत देशाचा पाया रचला जाईल.

आणखी वाचा

Mandya Flag Issue : कर्नाटकमध्ये 108 फूट उंच हनुमान ध्वजावरून वाद, भाजप-काँग्रेस आमनेसामने

‘ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या ताब्यात द्या’, ASIच्या अहवालानंतर विहिंपची मागणी

Watch Video : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम