सार

Lok Sabha Elections 2024 : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणूक 2024साठी पक्षाच्या प्रचार मोहिमेची थीम लाँच केली आहे. 

Lok Sabha Elections 2024 : भाजपाने लोकसभा निवडणूक 2024साठी पक्षाच्या प्रचार मोहिमेची थीम लाँच (BJP Theme Song Launch) केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी (25 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रचार मोहिमेची थीम लाँच केली.

भाजपचे नमो नवमतदार संमेलन

भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये गुरुवारी (25 जानेवारी) नमो नवमतदार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या संमेलनामध्ये सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी कोट्यवधी लोकांची स्वप्ने पूर्ण केली आहेत, असे म्हणत भाजपाने आगामी निवडणुकीसाठी प्रचार मोहिमेचे थीम लाँच केले आहे.

यावेळेस जे.पी. नड्डा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना म्हटले की, ही मोहीम देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करायला हवे. तसेच या मोहिमेमध्ये सर्वसामान्यांनाही सहभागी करून घ्यावे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोट्यवधी लोकांची स्वप्न केली पूर्ण"

कार्यक्रमादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, “पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी आपली आश्वासने पूर्ण केली आणि कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. देशाची आजची पिढी आणि भावी पिढी ही अमृत पिढी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 वर्षांचे स्वप्ने पूर्ण करण्याचे काम केले आहे. 

आज देशातील तरुणांना नोकऱ्या मिळत आहेत. स्टार्टअप्समुळे केवळ उद्योजकांची संख्या वाढवली नाही तर लाखो रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत. आत्मनिर्भर भारताने देशातील शेतकरी, मजूर, छोटे व्यापारी, महिला आणि विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण केली आहेत. आर्थिक स्वातंत्र्याच्या जोरावर महिला स्वावलंबी होत आहेत. देशातील कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत आणि उत्तम आयुष्य जगत आहेत. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा बदल आहे”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नवमतदार संमेलनास (NaMo Nav Matadata Sammelan) संबोधित केले. पहिल्यांदाच मतदान (First time voters) करणाऱ्या मतदारांना उद्देशून ते म्हणाले की, “वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयावर काम करत आहे, त्यामुळे भारताची दिशा काय असेल, हे तुमचे मत ठरवेल. ज्या प्रमाणे वर्ष 1947च्या 25 वर्षांपूर्वी देशातील तरुणांवर देशाला स्वतंत्र करण्याची जबाबदारी होती, त्याचप्रमाणे वर्ष 2047पूर्वीच्या या 25 वर्षांमध्ये विकसित भारत घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे”.

"विकसित भारत घडवण्याची जबाबदारी"

पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यसैनिकांच्या नावांचा उल्लेख केला जातो, तेव्हा त्यांच्यापैकी बरेच जण 18 ते 25 या वयोगटातील होते. त्यांची नावे आजही इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांमध्ये लिहिलेली आहेत. विकसित भारताच्या 'अमृत काळ' या गाथेमध्ये तुमचे नाव सुवर्णाक्षरात लिहिण्याची संधी तुमच्यासमोर आहे, हे कार्य कसे करायचे? ते तुम्हीच ठरवायचे आहे".

आणखी वाचा 

Lok Sabha Elections 2024 : या तारखेला होणार का लोकसभा निवडणुका? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले उत्तर

Exclusive : पंतप्रधान मोदींचे कौतुक करत पी. गोपीचंद म्हणाले की, 'राम मंदिरामुळे रामराज्य येईल'