Mandya Flag Issue : कर्नाटकमध्ये 108 फूट उंच हनुमान ध्वजावरून वाद, भाजप-काँग्रेस आमनेसामने

| Published : Jan 29 2024, 01:08 PM IST / Updated: Jan 29 2024, 01:15 PM IST

hanuman flag

सार

Mandya Flag Issue : कर्नाटकमध्ये हनुमानाचा ध्वज फडकावणे आणि यानंतर खाली उतरवण्यावरून वाद वाढला आहे. या प्रकरणास आता राजकीय रंग प्राप्त झाला आहे. यावरून आता भाजप-काँग्रेस पक्ष आमनेसामने आले आहेत.

Hanuman Flag Row In Karnataka : कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यामध्ये (Mandya Flag Issue) केरागोडू गावामध्ये हनुमान ध्वजावरून सुरू झालेला वाद आता वाढला आहे. या मुद्यावरून सत्ताधारी काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. या प्रकरणी राज्यामध्ये अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.  

मागील आठवड्यामध्ये काही लोकांनी तब्बल 108 फूट उंच स्तंभ उभारून त्यावर हनुमानाचा ध्वज (Hanuman Flag) फडकावल्याने हा वाद सुरू झाला आहे. हा ध्वज फडकावण्यास ग्रामपंचायतीकडून मंजुरी मिळाली होती.

ध्वज उतरवण्याची मागणी

काही लोकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करून ध्वज उतरवण्याची मागणी केल्याने हा वाद आणखी वाढला. दुसरीकडे ग्रामस्थ हा ध्वज उभारण्याच्या निर्णयाच्या बाजूने एकत्र असल्याचे दिसले आणि काही जण यास राजकीय रंग देऊ इच्छित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान गावामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

तर दुसरीकडे भाजपसह जेडीएस आणि बजरंग दलाने ग्रामस्थांसह आंदोलन करण्यास सुरुवात केली. शनिवारी (27 जानेवारी) देखील मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. यानंतर ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी ध्वज उतरवण्यासाठी आले असता ग्रामस्थांकडून यास विरोध दर्शवण्यात आला.

गावामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

आता या वादास राजकीय रंग प्राप्त झाला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार रवी कुमार परिसरात दाखल होताच, त्यांनाही विरोध करण्यात आला. यानंतर गावामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भाजप नेते आणि हिंदू संघटनांकडून ध्वज खाली उतरवण्यास विरोध केला जात आहे. याबाबत आता आंदोलनाची रणनीती आखण्यात आली आहे. बंगळुरू शहरातही निदर्शने करण्यात येत आहेत. निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले. 

आणखी वाचा

‘ज्ञानवापी संकुल हिंदूंच्या ताब्यात द्या’, ASIच्या अहवालानंतर विहिंपची मागणी

Watch Video : ‘…म्हणूनच सर्वजण मोदींना निवडतात’, भाजपाने लाँच केली प्रचार मोहिमेची थीम

मुख्यमंत्र्यांनी जरागेंच्या कपाळी गुलाल लावला, ज्युस पाजला! आंदोलन यशस्वी झाल्यानंतरचे पाहा हे 10 PHOTOS