Gold Price : भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत घसरल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका आठवड्यात सोने 5,000 रुपयांनी वाढून 1,31,000 रुपयांवर पोहोचले.
Gold Price : भारतीय रुपया गेल्या काही दिवसांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. रुपया कमकुवत झाल्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतींवर दिसत आहे. एकाच आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल ₹5,000 ची वाढ झाली आहे. जीएसटीसह एका तोळ्याचे सोने आता 1,31,000 रुपयांच्या आसपास पोहोचले असून हे भाव लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांसाठी मोठा धक्का ठरत आहेत. ट्रम्प सरकारच्या टॅरिफ धोरणांमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची सतत घसरण होत आहे आणि डॉलरचा दर 90 रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. यामुळे सोने आयात अधिक महाग होऊन त्याच्या दरात थेट वाढ झाली आहे.
आयात महागल्याने सोन्याच्या बाजारात उडाली खळबळ
रुपया कमजोर झाल्याने भारताला सोने आयात करण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागते. त्यामुळे बाजारातील दर झपाट्याने चढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव जीएसटीसह 1,26,000 रुपयांवरून थेट 1,31,000 रुपयांवर पोहोचले. सुवर्ण व्यापाऱ्यांच्या मते, ही वाढ पुढील काही दिवसांतही कायम राहू शकते. लग्नसराईच्या तोंडावर झालेली ही दरवाढ ग्राहकांचे बजेट बिघडवणारी असून आता सोन्याची खरेदी अनेकांसाठी अवघड ठरणार आहे.
2026 मध्ये सोनं आणखी महागणार?
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या ताज्या नोटनुसार, सोन्याचे दर 2026 पर्यंत आणखी 15 ते 30 टक्क्यांनी वाढू शकतात. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,000 ते 1,30,000 रुपयांदरम्यान आहे. 30% वाढ झाली, तर एका तोळ्याचा दर पुढील दोन वर्षांत 35,000 ते 40,000 रुपयांनी वाढू शकतो. 2025 मध्ये सोन्याच्या दरात आधीच 53% वाढ झाली आहे, त्यामुळे या अंदाजाकडे गुंतवणूकदारही लक्ष देत आहेत.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण, विद्यार्थ्यांचा खर्च वाढला
गुरुवारी रुपया एक डॉलरच्या तुलनेत 90.43 रुपये या पातळीपर्यंत खाली गेला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि भारत-अमेरिका करारातील विलंबामुळे रुपयावर दबाव वाढला आहे. रुपया घसरल्याने परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तथापि, रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपाच्या चर्चेमुळे काल रुपया 19 पैशांनी वधारुन 89.96 रुपयांवर बंद झाला.


