सार

हरियाणातील शेतकरी ३०३ दिवसांपासून आंदोलन करत असून, १४ डिसेंबर रोजी दिल्लीत मोर्चा काढणार आहेत. शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी दिल्ली कूचची घोषणा केली असून, चित्रपटसृष्टी, नेते आणि धर्मगुरूंना पाठिंबा मागितला आहे.

Farmers Delhi March: शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारी शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी घोषणा केली की, शेतकरी १४ डिसेंबरला दिल्लीकडे मोर्चा काढणार आहेत. हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी ३०३ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. तर गेल्या १५ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी शासनाच्या एकाही प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला नाही. तर शेतकरी नेहमीच त्यांच्याशी बोलायला तयार असतो, असा आरोप पंढेर यांनी केला. ते म्हणाले की, आता दिल्लीकडे कूच करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

दिल्लीला लागून असलेल्या शंभू सीमेवर फेब्रुवारीपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. १३ फेब्रुवारीपासून शेतकरी शंभू सीमेवर आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत. शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचे आता दिल्ली मार्चमध्ये रूपांतर होणार आहे. अलीकडेच शेतकऱ्यांनी आपला एक गट दिल्लीला पाठवला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून ठिकठिकाणी बॅरिकेड्स आणि काटेरी तारा लावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. अनेक शेतकरी जखमी झाल्याने शेतकरी संघटनेने गटाला माघारी बोलावले होते. आता पुन्हा एकदा दिल्ली मोर्चाच्या नव्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

पंढेर यांनी चित्रपटसृष्टी, नेते आणि धर्मगुरूंना मागितला पाठिंबा

शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी चित्रपट तारे, गायक, धार्मिक नेत्यांना शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन मोठ्या व्यक्तींनी एकत्र यावे, असे ते म्हणाले. तसेच अटकेत असलेल्या शेतकऱ्यांची सुटका करण्याचे आवाहन केले.

६ आणि ८ डिसेंबर रोजी दिल्लीकडे केली कूच

संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनरखाली १०१ शेतकऱ्यांच्या गटाने ६ आणि ८ डिसेंबरला दोनदा दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हरियाणा आणि दिल्लीच्या पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाऊ दिले नाही. शेतकरी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत अनेक शेतकरी जखमी झाले.

शेतकऱ्यांची मागणी काय आहे?

एमएसपीची कायदेशीर हमी, कर्जमाफी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, वीजदर महाग करू नये, शेतकऱ्यांवर लावलेले पोलिस केस मागे घ्यावेत, लखीमपूर खेरी हिंसाचारातील पीडितांना न्याय मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणीही हे शेतकरी करत आहेत.

आणखी वाचा-

राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी आणला अविश्वास प्रस्ताव

खासदारांनी घातले मोदी, अदाणींचे मास्क; राहुल गांधींनी घेतली मुलाखत, पाहा व्हिडीओ