सार
अदानी प्रकरणावरून संसदेत विरोधी पक्षांनी गदारोळ केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांचा मुखवटा घातलेल्या खासदारांची 'मुलाखत' घेतली.
नवी दिल्ली : अदानी प्रकरणामुळे सोमवारी संसदेतील कामकाजावरही परिणाम झाला. अदानी मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केला. त्याचवेळी अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि काँग्रेस यांच्यातील संबंधांवर भाजप नेत्यांनी आवाज उठवला. दरम्यान, संसद संकुलात अनोखे दृश्य पाहायला मिळाले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचा मुखवटा घालुन लक्ष वेधून घेतले.
राहुल गांधीनी घेतली मुलाखत
दोन विरोधी पक्षाच्या खासदारांनी तोंडावर मास्क घातले होते. एकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसऱ्याने उद्योगपती गौतम अदानी यांचा मुखवटा घातला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार म्हणून उभे राहून दोघांची मुलाखत घेतली. काँग्रेसने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तहकूब
हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही सभागृहात वारंवार गोंधळ पाहायला मिळत आहे. अदानी यांच्याशी संबंधित अमेरिकेतील कथित लाचखोरीच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी विरोधक केंद्र सरकारवर दबाव आणत आहेत. सोमवारीही हिच परिस्थिती होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
आणखी वाचा-
भाजप नेते संबित पात्रा यांनी राहुल गांधींना देशद्रोही का म्हटले?