Faridabad woman Doctor Arrested : जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरची बहीण सादिया अझहरच्या नेतृत्वाखालील जैशच्या महिला विंग 'जमात उल मोमिनाथ'च्या भारतीय शाखेची जबाबदारी डॉ. शाहीन शाहीदकडे सोपवण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे.

Faridabad woman Doctor Arrested : फरीदाबादमध्ये शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या (JeM) महिला विंगशी संबंध असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. राष्ट्रीय माध्यमांनी दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेवर भारतात जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा स्थापन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. जैशचा संस्थापक मसूद अझहरची बहीण सादिया अझहरच्या नेतृत्वाखालील 'जमात उल मोमिनाथ' या महिला विंगच्या भारतीय शाखेची जबाबदारी डॉ. शाहीन शाहीदकडे देण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. सादिया अझहरचा पती युसूफ अझहर हा कंदाहार विमान अपहरणाचा मुख्य सूत्रधार होता आणि ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तो मारला गेला.

शाहीन शाहीद ही लखनऊच्या लाल बाग येथील रहिवासी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. फरीदाबादमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर आणि तिच्या कारमधून एक असॉल्ट रायफल जप्त केल्यानंतर तिला अटक करण्यात आली. शाहीन ही अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित असून, फरीदाबादमधील दोन भाड्याच्या खोल्यांमधून २,९०० किलो स्फोटके आणि ज्वलनशील पदार्थ जप्त केल्यानंतर अटक करण्यात आलेल्या मुजैब नावाच्या काश्मिरी डॉक्टर मुजम्मिलच्या जवळची असल्याचेही वृत्त आहे.

पुलवामा कनेक्शन

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील रहिवासी असलेला मुजम्मिल दिल्लीपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धौज येथील अल-फलाह विद्यापीठात डॉक्टर होता. श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर लावल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मुजम्मिलला फरार घोषित केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

शस्त्रसाठा सापडला

असॉल्ट रायफल, पिस्तूल आणि काडतुसे ठेवण्यासाठी वापरलेली कार शाहीन शाहीदची असल्याचे तपास अधिकाऱ्यांना आढळून आले. फरीदाबादचा कोड HR 51 असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट कार, मुजम्मिलच्या चौकशीनंतर पोलिसांनी तपासली. त्याच्याच खुलाशांमुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय असलेली स्फोटके, २० टायमर आणि इतर संशयास्पद वस्तू शोधण्यात मदत झाली.