अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. याचे पडसाद शेअर मार्केटवर होत जवळजवळ 3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे.

मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणाचा भारताला जबरदस्त फटका बसला आहे. 31 जुलै रोजी सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. सेन्सेक्स तब्बल 800 अंकांनी घसरून 80,695.15 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला, तर निफ्टी 24,650 च्या खाली घसरला. गुंतवणूकदारांचे अवघ्या 10 मिनिटांत 3 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

टॅरिफ धोरणाचा प्रभाव

ट्रम्प यांनी भारताकडून होणाऱ्या आयातींवर 25 टक्के कर आणि दंड लावला, यामुळे शेअर बाजारात घबराट निर्माण झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात 2 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. विक्रीचा जोर मिड आणि स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये जास्त दिसून आला.

गुंतवणूकदारांचे जबर नुकसान

सत्राच्या सुरुवातीलाच BSE सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 452 लाख कोटींवरून 449 लाख कोटींवर घसरले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान नोंदवले गेले.

कारण काय?

1 ऑगस्टपासून भारताने रशियन तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प प्रशासनाने भारतावर दंड लादला. त्यामुळे भारतीय निर्यातदार आणि कंपन्यांवर थेट परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, टॅरिफ दीर्घकाळ टिकल्यास GDP आणि चलनावर परिणाम होऊ शकतो. परकीय गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे.

कुठल्या क्षेत्रांवर परिणाम?

फार्मा, ऑटो उपकरणे, औद्योगिक कंपन्या, केबल्स, वायर्स, टाइल्स इत्यादी क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच वेळी, रुपयाच्या घसरणीचा आयटी कंपन्यांना थोडा फायदा होऊ शकतो.

ब्रोकरेज फर्मचा इशारा

"SMIDs, NBFCs, रिअल इस्टेट व इतर चक्रीय क्षेत्रांना मोठा झटका बसू शकतो," असे नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने सांगितले. बाजारात सध्या सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.