पंतप्रधान मोदींनी भारत-पाक युद्धात विजयाची संधी असतानाही ऑपरेशन सिंदूर अर्धवट का सोडले, असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
नवी दिल्ली: 'नेत्याने केवळ कौतुकापुरते मर्यादित राहू नये, तर जबाबदारीही स्वीकारायला हवी. भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे. हे पंतप्रधान मोदींच्या बेजबाबदारपणाचे उदाहरण आहे,' अशी टीका काँग्रेस खासदार प्रियांका वद्रा यांनी केली. लोकसभेत बोलताना त्या म्हणाल्या, 'शत्रू पराभवाच्या मार्गावर असताना ऑपरेशन सिंदूर अर्धवट का सोडण्यात आले? असे विजयाचे युद्ध अर्धवट सोडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये,' असेही त्यांनी म्हटले.
अमित शाह यांना टोला
'काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी २००८ च्या दिल्लीतील बाटला हाऊस एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी अश्रू ढाळले होते,' असे म्हणणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रियांका यांनी प्रत्युत्तर दिले. 'अमित शाह माझ्या आईच्या अश्रूंवर टीका करतात, माझे वडील ४४ वर्षांचे असताना त्यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. तेव्हा माझ्या आईला रडू कोसळले होते. म्हणूनच पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या २६ जणांचे दुःख मला समजते,' असे प्रियांका म्हणाल्या.
खर्गे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द : नड्डा यांची माफी
ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि सभागृह नेते जे.पी.नड्डा यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पंतप्रधान मोदींबद्दल खर्गे 'मानसिक संतुलन' गमावून बोलले, असा आरोप करणाऱ्या नड्डा यांनी नंतर आपल्या विधानाबद्दल माफी मागितली.
खर्गे यांचे भाषण संपल्यानंतर उभे राहून नड्डा म्हणाले, 'तुम्ही पक्षाशी इतके एकरूप झाला आहात की तुम्हाला देशाचा विचार दुय्यम वाटतो. बोलताना तुम्ही मानसिक संतुलन गमावता.' यावर खर्गे म्हणाले, 'मी ज्या दोन-तीन मंत्र्यांचा आदर करतो त्यात नड्डाही आहेत. पण त्यांनी मला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ म्हटले आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यांनी याबद्दल माफी मागावी.'
त्यावर नड्डा म्हणाले, 'मी आधीच वापरलेले शब्द मागे घेतले आहेत. यामुळे खर्गे यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.'
पाक हल्ल्यात अनाथ झालेल्या २२ मुलांच्या शिक्षणासाठी राहुल गांधींची मदत
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात ऑपरेशन सिंदूरच्या वेळी पाकिस्तानच्या गोळीबारात पालक गमावलेल्या २२ मुलांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी आर्थिक मदत दिली. राहुल यांच्यावतीने प्रदेश काँग्रेस समिती अध्यक्ष तारिक हमीद यांनी पुंछमधील शिक्षणापासून वंचित असलेल्या पीडित मुलांना राहुल यांनी दिलेली आर्थिक मदत दिली. 'राहुल पुंछला भेट देऊन पालक गमावलेल्या शाळेत जाणाऱ्या मुलांची यादी तयार करायला सांगितली होती. त्यानुसार २२ मुलांची यादी दिली. अशा आणखी मुलांचा समावेश होऊ शकतो,' असे ते म्हणाले.


