Students Protest Against Devendra Fadnavis in JNU : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी सामरिक अध्ययन केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. मात्र, यावेळी काही विद्यार्थ्यांनी निदर्शने केली.
नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित शिक्षणसंस्था जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथे आज कुसुमाग्रज मराठी सामरिक अध्ययन केंद्र सुरू करण्यात आलं. या केंद्राच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडत असतानाच, विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली.
या कार्यक्रमादरम्यान, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या विद्यार्थी संघटनेने फडणवीस यांच्याविरोधात आंदोलन छेडले. आंदोलकांनी फडणवीस यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका केली. काहींनी भारतात हिंदी भाषा सक्तीने लादली जात आहे, असा आरोप केला, तर काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात अमराठी नागरिकांवर होणाऱ्या कथित अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला.
आंदोलकांची टीका आणि भूमिका
आंदोलक विद्यार्थ्यांपैकी एका प्रतिनिधीने सांगितले, "देशाच्या कोणत्याही भागात प्रवास करण्याचा आमचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र महाराष्ट्रात गेल्यावर आमच्यावर मराठी बोलण्याचा दबाव आणला जातो, हे योग्य नाही." काही विद्यार्थ्यांनी हिंदीच्या वर्चस्वाविरोधात आवाज उठवला, तर इतरांनी महाराष्ट्रात अमराठी नागरिकांवर होणाऱ्या कथित अत्याचारांबाबत नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर उद्घाटन सोहळा काही प्रमाणात गोंधळात पार पडला.
मराठी अध्ययन केंद्राचा इतिहास आणि गरज
जेएनयूमध्ये मराठी अध्ययन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव तब्बल 17 वर्षांपूर्वी मांडण्यात आला होता. मात्र तो वर्षानुवर्षे कागदावरच राहिला होता. अखेर 2024 मध्ये या केंद्राच्या प्रत्यक्ष उद्घाटनाने मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या अपेक्षांना दिशा मिळाली आहे. मराठी भाषेला दिल्लीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील विद्यापीठात स्थान मिळणे ही भाषा-संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची पावले मानली जात आहेत. या सोहळ्याला फडणवीस यांच्यासोबत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचीही उपस्थिती होती.
भाषा वादाचा राजकीय संदर्भ
सध्या महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करण्यावरून वाद सुरू आहे. हिंदी सक्तीला विरोध करत मनसे प्रमुख राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यामुळे हिंदी विरुद्ध मराठी असा वाद नव्याने पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अशा पार्श्वभूमीवर दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात मराठी अध्ययन केंद्राचे उद्घाटन ही एक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. मात्र, उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे या कार्यक्रमाला वादाचं कोंदण लाभलं.
