मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलन पुकारलं होतं. पण या आंदोलकांवर काही गुंडांनी भयंकर हल्ला केला. भररस्त्यात एका तरुणीचे कपडे फाडण्याचा आणि तिला मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. या तरुणीला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या मित्रालाही बेदम मारहाण करण्यात आली. एवढंच नाही, तर या घटनेचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना आणि कॅमेरामनलाही धक्काबुक्की करत रोखण्याचा प्रयत्न झाला.

या हल्ल्यामागे भाजप आणि आरएसएसचे कार्यकर्ते असल्याचा थेट आरोप काँग्रेसनं केला आहे. काँग्रेस पक्षानं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, हा सगळा प्रकार घडत असताना दिल्ली पोलीस तिथेच होते, पण त्यांनी काहीही न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली, असा गंभीर आरोप आंदोलक आणि विरोधी पक्षांनी केला आहे.

दिल्लीत सध्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आंदोलनांचा जोर वाढला आहे. त्यामुळे पोलिसांनी हजारो लोकांना ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील मेट्रो सेवा आणि इतर वाहतूक व्यवस्थेवरही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओच्या आधारे दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता विविध विद्यार्थी आणि युवा संघटनांनी लावून धरली आहे.