पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात आम आदमी पार्टीशी (AAP) संबंधित सरपंच अश्वनी देवगण यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.

पंजाबमध्ये निवडणुकांचे वारे वाहत असतानाच तरनतारन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीशी (AAP) संबंधित असलेले गावचे सरपंच अश्वनी देवगण यांची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली. या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. पंजाबच्या तरनतारनमध्ये ही घटना घडली.

अवघ्या १७ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एक एसयूव्ही (SUV) कार गजबजलेल्या रस्त्यावरून उजवीकडे वळताना दिसते. त्याचवेळी कारचा पाठलाग करणारी एक दुचाकीही वळण घेते आणि कारच्या वेगाशी वेग मिळवत शेजारी येते. काही सेकंदातच दुचाकीवर मागे बसलेला हल्लेखोर बंदूक काढतो आणि कारमध्ये बसलेल्यांवर गोळ्यांचा पाऊस पाडतो.

गोळीबारानंतर कार जागीच थांबते आणि हल्लेखोर गर्दीच्या रस्त्यावरून दुचाकीवरून वेगाने पळून जातात.

Scroll to load tweet…

तरनतारनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) सुरिंदर लांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तूत गावचे सरपंच अश्वनी देवगण यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

पोलिसांनी सांगितलं की, देवगण हे तूत बस स्टँडवर गेले होते. तिथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून पळ काढला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या हत्येमागे कोणतीही जुनी दुश्मनी, खंडणीची मागणी किंवा धमकी असल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही, असं लांबा यांनी स्पष्ट केलं. देवगण यांनी कधीही पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली नव्हती. आता या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे.

हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि ते कोणत्या मार्गाने पळाले हे शोधण्यासाठी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं पाठवण्यात आली असून, घटनास्थळावरून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर तूत बस स्टँडचा परिसर सील करण्यात आला. तरनतारन आणि शेजारच्या अमृतसर जिल्ह्यातील फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच आणखी एका सरपंचाची हत्या

देवगण यांच्या हत्येच्या काही दिवस आधीच पंजाबमध्ये आणखी एका माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी लुधियानामधील मन्नेवाल गावचे ५५ वर्षीय माजी सरपंच नवजीत सिंग नीतू यांची गावाजवळच दोन अज्ञात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी हत्या केली.

नीतू हे घुमार मंडी येथील त्यांच्या घरी जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.