दिल्ली-एनसीआरमध्ये भूंकपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. सकाळी 9 वाजून 04 मिनिटांनी नागरिकांना भूकंपाचे धक्के अनुभवले. 4.4 रिश्टर स्केल एवढे धक्के होते.
दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी सकाळी 9:04 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या धक्क्यांची तीव्रता 4.4 रिश्टर स्केलवर नोंदवण्यात आली असून हरियाणातील झज्जर हे याचे केंद्रबिंदू होते. भूकंप काही सेकंद चालला आणि अनेक घरांमध्ये पंखे व इतर वस्तू हलू लागल्यामुळे लोकांनी घराबाहेर धाव घेतली.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे दिल्ली मेट्रोचे कामकाज काही वेळ थांबवण्यात आले. मात्र अल्पावधीतच मेट्रो सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आली. नोएडा आणि गुरुग्राममधील अनेक कार्यालयांमध्ये संगणक हादरले, कर्मचाऱ्यांना धक्के जाणवले, आणि कार्यालयांमधूनही काही वेळेसाठी बाहेर येण्यात आले.
याआधी 12 मे रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही भूकंपाचे सौम्य ते तीव्र धक्के जाणवले होते. त्या वेळी अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर आपल्या अनुभवांची माहिती शेअर केली होती. काहींनी सौम्य कंपनाबद्दल सांगितले, तर काहींनी त्याला धडकी भरवणारे म्हटले.
17 फेब्रुवारी 2025 रोजीही, सकाळी सहाच्या सुमारास दिल्लीतील धौला कुआं भागात भूकंप झाला होता. त्या वेळी भूकंपाची तीव्रता 4.0 रिश्टर स्केलवर होती आणि त्याचे केंद्र जमिनीपासून सुमारे 5 किलोमीटर खोल असल्याचे सांगण्यात आले होते. सुदैवाने त्या भूकंपात **कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नव्हती. पण नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
दिल्ली ही देशातील भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. भारतात चार प्रमुख भूकंप क्षेत्र (Seismic Zones) आहेत आणि दिल्ली Zone IV मध्ये येते. नैनिताल, उत्तराखंड, पाटणा, गोरखपूर, गंगटोक यांसारख्या शहरांप्रमाणेच दिल्लीमध्ये भूकंपाचा धोका अधिक असल्याचे मानले जाते. जर मोठा भूकंप झाला तर त्याची तीव्रता 6 ते 6.9 पर्यंत असू शकते.
दिल्लीची भौगोलिक स्थितीही भूकंपप्रवण आहे. दिल्ली हिमालयाच्या जवळ असल्यामुळे, भारत आणि युरेशिया या टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचाली या शहरावर प्रभाव टाकतात. नेपाळ आणि तिबेटमधील भूकंपांचे हादरेही दिल्लीपर्यंत पोहोचतात, त्यामुळे भविष्यात मोठ्या भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही.


