आठ वर्षांच्या जुन्या मानहानीच्या प्रकरणात युट्यूबर ध्रुव राठी विरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. वारंवार समन्स पाठवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
मुंबई : न्यायालयात हजर न राहिल्याने युट्यूबर ध्रुव राठी विरोधात एका आठ वर्षांच्या जुन्या गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट साकेत न्यायालयाने जारी केले आहे. यापूर्वी 17 ऑक्टोबरला त्याच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते, पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार असल्याचे न्यायालयाने ठरवले आहे.
अटक वॉरंट जारी करण्याचे कारण
मे 2018 मध्ये ध्रुव राठीने अपलोड केलेल्या एका व्हिडिओच्या आधारे विकास सांकृत्यायन (ज्यांना विकास पांडे म्हणूनही ओळखले जाते) यांनी हा मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्या व्हिडिओमध्ये राठीने असा दावा केला होता की, त्याला बदनाम करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आयटी सेलने पांडेला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. हा व्हिडिओ नंतर राठीने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता आणि दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तो रिट्विट केला होता. या व्हिडिओतील आरोप आणि तो पसरवल्याबद्दल पांडे यांनी राठी आणि केजरीवाल या दोघांविरुद्ध गुन्हेगारी मानहानीचा खटला सुरू केला.
जुलै 2019 मध्ये पहिल्यांदा राठीला न्यायालयाने समन्स बजावले होते. पण गेल्या काही वर्षांत वारंवार प्रयत्न करूनही समन्स पाठवण्याची प्रक्रिया यशस्वी झाली नाही. आधीच्या एका सुनावणीत न्यायालयाला सांगण्यात आले होते की, गुडगावमधील राठीच्या घरी समन्स देण्यासाठी गेल्यावर घराला कुलूप असल्याचे आढळले.
ही कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी अशी विनंती तक्रारदाराने न्यायालयाकडे केली आहे. ध्रुव हा प्रामुख्याने परदेशात राहत असल्याने त्याला वारंवार समन्स पाठवण्याचे प्रयत्न फसत असल्याचे त्यांनी सांगितले. समन्स पाठवण्याचे काम सोपे व्हावे यासाठी न्यायालयाने तक्रारदाराला संबंधित अधिकाऱ्यासोबत जाण्याची परवानगी दिली होती.
पुढील सुनावणी
त्यानंतर 17 ऑक्टोबरला न्यायालयाने राठीविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न झाल्याने आता अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
















