दिल्लीच्या सत्य निकेतनमधली इमारत कोसळून ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीचा मालक हरिराम फरार असून, दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी केलं आहे.
मुंबई : दिल्लीच्या सत्य निकेतन भागात एक इमारत कोसळून सहा जणांचा जीव गेला. या घटनेनंतर इमारतीचा मालक हरिराम फरार झाला आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केलं आहे. पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.
ज्या इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली, तिथे एक पीजी (पेइंग गेस्ट) होतं. सोमवारी दुपारी ही इमारत कोसळली आणि अनेक विद्यार्थी आत अडकले. आतापर्यंत ११ विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर सहा जणांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
तपास आणि बचावकार्य
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. एनडीआरएफच्या (NDRF) नेतृत्वाखाली बचावकार्य अजूनही सुरू आहे, जेणेकरून ढिगाऱ्याखाली कोणीही अडकलेलं नाही याची खात्री करता येईल. इमारतीच्या स्थितीबद्दल आणि तिच्या बांधकामाबद्दल जे दावे केले जात आहेत, पोलीस त्याचीही तपासणी करत आहेत.
आमदारांनी बेकायदेशीर बदलांना जबाबदार धरलं
या घटनेबद्दल बोलताना भाजपचे आर. के. पुरमचे आमदार अनिल शर्मा म्हणाले, "दुर्घटनेच्या वेळी पीजीमध्ये नक्की किती लोक होते याचा नेमका आकडा नाही. पण साधारणपणे १३ मुलं आणि ३-४ मजूर, असे एकूण १६-१७ जण असावेत. यापैकी १२ जणांना वाचवण्यात आलं. दुर्दैवाने, ६ जणांचा जीव वाचू शकला नाही. देवाच्या कृपेने वाचलेले ६ जण सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत बचावकार्य पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे."
शर्मा यांनी सांगितलं की, “ही ४० वर्ष जुनी इमारत होती आणि तिच्या तळमजल्यावर किंवा बेसमेंटमध्ये दुरुस्तीचं काम सुरू होतं. ओलसरपणामुळे किंवा काही बदल करण्यासाठी हे काम सुरू असावं. असं दिसतंय की, हे बदल करताना इमारतीचा भार पेलणाऱ्या एक-दोन मुख्य भिंतींना धक्का लागला किंवा त्या काढण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण इमारत कोसळली. बिल्डर किंवा मालकाच्या चुकीमुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. असं काम करायचं असेल, तर इंजिनिअरची मदत घ्यायला हवी होती, जेणेकरून ही घटना टाळता आली असती.” मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जबाबदार व्यक्तीवर कडक कारवाई केली जात आहे आणि त्याला अटक झाली आहे किंवा लवकरच होईल, असंही ते म्हणाले.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
या घटनेचा एक प्रत्यक्षदर्शी, सुरजीत, जो आर्यभट्ट कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि त्याच परिसरात राहतो, त्याने घडलेला प्रकार सांगितला. तो म्हणाला की, दुपारी सव्वा ते दीडच्या सुमारास इमारत कोसळल्याचं कळताच तो लगेच घटनास्थळी धावला. "त्यावेळी नक्की किती जणांचा मृत्यू झाला हे स्पष्ट नव्हतं, पण कोण आत अडकलंय आणि कोण नाही, याचा अंदाज येत होता. जे लोक सहज बाहेर काढता येण्यासारखे होते, त्यांना आम्ही बाहेर काढलं," असं सुरजीतने सांगितलं.
दिल्ली सरकारचा बेकायदेशीर इमारतींवर बडगा
दरम्यान, दिल्ली सरकारने शहरातील बेकायदेशीर पाच मजली इमारती तात्काळ सील करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज सकाळी पुन्हा घटनास्थळाला भेट देऊन सुरक्षा उपाययोजना आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.


