कर्नाटकमध्ये NWKRTC बसच्या हेडलाईटमध्ये बिघाड झाल्यानंतर एक धक्कादायक प्रकार घडला. धारवाडजवळ सौंशी येथे बसचे हेडलाईट बंद पडले. यानंतर प्रवाशांनीच आपले मोबाईल टॉर्च सुरू करून ड्रायव्हरला रस्ता दाखवला. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्नाटकात एक विचित्र आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नॉर्थ वेस्टर्न कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NWKRTC) म्हणजेच आपल्याकडच्या एसटी महामंडळासारख्या सरकारी बसच्या ड्रायव्हरने चक्क प्रवाशांच्या मोबाईल टॉर्चच्या उजेडात बस चालवली. झालं असं की, धारवाड जिल्ह्यात एका ग्रामीण भागात बसच्या हेडलाईटमध्ये अचानक बिघाड झाला आणि त्या बंद पडल्या. या घटनेमुळे बसच्या देखभालीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे, काही लोकांनी प्रसंगावधान राखून प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवणाऱ्या ड्रायव्हरचं कौतुकही केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस रात्री ८ वाजता हुबळीहून अत्तिगेरेच्या दिशेने निघाली होती. कुंदगोळ तालुक्यातील सौंशी बस स्टॉपजवळ पोहोचल्यावर शॉर्ट सर्किटमुळे बसच्या पुढच्या वायरिंगमध्ये बिघाड झाला आणि हेडलाईट्स पूर्णपणे बंद पडल्या.

प्रवाशांनी दाखवला मोबाईलच्या टॉर्चने रस्ता

हेडलाईट्स बंद पडल्यामुळे बसमध्ये अंधार झाला. तेव्हा प्रवाशांनीच आपले मोबाईल फोन काढले आणि त्याच्या टॉर्चच्या उजेडात ड्रायव्हरला पुढचा रस्ता दाखवला. दुसऱ्या बसची वाट पाहण्याऐवजी, ड्रायव्हर आणि कंडक्टरने त्याच परिस्थितीत बस पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

अंधारात आणि कमी उजेडात ड्रायव्हरने गुडगेरीपर्यंत बस चालवली. साधारणपणे ११ ते १२ किलोमीटरचं हे अंतर कापायला नेहमीपेक्षा जास्त, म्हणजे जवळपास ४५ मिनिटं ते एक तास लागला. कारण, अशा परिस्थितीत गाडी चालवणं खूपच अवघड होतं.

या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचाऱ्यांना गाडीत बिघाड झाल्यावर, विशेषतः कमी प्रकाशाच्या ग्रामीण रस्त्यांवर प्रवास करताना येणाऱ्या अडचणी समोर आल्या आहेत.

Scroll to load tweet…

एका प्रवाशाने घटनेचा व्हिडिओ बनवला

गुडगेरी बस स्टॉपवर एका प्रवाशाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी सांगताना दिसतोय की, हेडलाईट बंद पडल्यामुळे सौंशी ते गुडगेरीपर्यंतचा प्रवास मोबाईल टॉर्चच्या उजेडात कसा केला.

व्हिडिओमध्ये ड्रायव्हरसुद्धा बसच्या वायरिंगमध्ये बिघाड झाल्याचं मान्य करतोय आणि त्यामुळेच सगळी सिस्टीम बंद पडल्याचं स्पष्टीकरण देतोय.

या व्हिडिओमुळे हे प्रकरण लोकांसमोर आलं आणि NWKRTC बसने हेडलाईटशिवाय प्रवास सुरू ठेवणं योग्य होतं का, यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

NWKRTC बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे प्रवाशांची सुरक्षा आणि वाहनांची देखभाल यावर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही सोशल मीडिया युजर्सनी प्रश्न विचारला आहे की, हेडलाईट बंद पडल्यानंतर, विशेषतः अंधाऱ्या ग्रामीण रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीच्या बसला पुढे प्रवास करण्याची परवानगी कशी दिली गेली?

प्रवास पुढे सुरू ठेवण्याऐवजी दुसरी बस का बोलावली नाही, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे. हेडलाईटशिवाय बस चालवल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरचं काहीच दिसत नाही आणि अपघाताचा धोका वाढतो.

त्याच वेळी, काही युजर्सनी ड्रायव्हरचं कौतुकही केलं आहे. कारण त्याने गाडीत बिघाड होऊनही प्रवाशांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं.

या घटनेने NWKRTC बसची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. तसंच, प्रवासादरम्यान अचानक गाडीत बिघाड झाल्यास ड्रायव्हर्सना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, हेही यातून दिसून आलं आहे.