सार
जम्मू आणि काश्मीर सीमेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत CRPF जवान सतीश कुमार शहीद झाले होते. ९ वर्षांनंतर, शहीद जवानाच्या मुलीच्या लग्नासाठी CRPF जवानांचा एक गट आला. लग्नासह सर्व जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या जवानांनी वडिलांच्या भूमिकेत कन्यादान केले.
हरियाणा. हुतात्म CRPF जवान सतीश कुमार यांच्या मुलीचा विवाह थाटामाटात पार पडला. या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण लग्नाची जबाबदारी CRPF जवानांनी सांभाळली. वडिलांच्या भूमिकेत कन्यादान करण्याचा हा भावनिक क्षण हरियाणातील चट्टार गावात घडला. सतीश कुमार यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट या क्षणाला साक्षीदार होते. यावेळी जवानांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या.
चट्टार गावातील CRPF जवान सतीश कुमार ९ वर्षांपूर्वी, म्हणजेच २० मार्च २०१५ रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. जम्मू आणि काश्मीरमधील कटुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सतीश कुमार शहीद झाले. गरीब कुटुंबातील सतीश कुमार हे धाडसी CRPF जवान म्हणून ओळखले जात होते. दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत सतीश कुमार नेहमीच पुढे असायचे. मात्र सतीश कुमार यांच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यावेळी अंत्यसंस्कारात CRPF जवानांनी सतीश कुमार यांच्या मुलीला आणि कुटुंबाला धीर दिला होता. पुढील काळातही CRPF नेहमीच तुमच्यासोबत असेल असे सांगितले होते.
सतीश कुमार शहीद झाल्यानंतर ९ वर्षांनी त्यांची मुलगी निशा हिचा विवाह ठरला. CRPF जवान पुन्हा एकदा सक्रिय झाले. निशाचे वडील सतीश कुमार शहीद झाल्यामुळे वडिलांची उणीव तिला जाणवू नये अशी CRPF जवानांची इच्छा होती. निशाच्या लग्नासाठी आलेल्या CRPF जवानांनी सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या. वडिलांच्या भूमिकेत निशाचा विवाह लावून दिला. वर आणि वराच्या कुटुंबीयांचे CRPF जवानांनी स्वागत केले. त्यानंतर लग्नाच्या सर्व परंपरा आणि विधी पार पाडले. कन्यादान करून थाटामाटात लग्न सोहळा पार पाडला.
CRPF DIG कोमल कुमार यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. सतीश कुमार आमच्यासोबत CRPF टीममध्ये होते. आता या शुभप्रसंगी सतीश कुमार यांच्या मुलीला वडिलांची उणीव जाणवू नये. कन्यादान करताना ती हसत राहावी. म्हणूनच आम्ही तिच्या लग्न सोहळ्यात सहभागी झालो आहोत, असे ते म्हणाले.
CRPF जवानांनी येऊन कन्यादान केल्याने निशा, हुतात्म सतीश कुमार यांचे कुटुंब आणि लग्नाला आलेले कुटुंबीय भावुक झाले.