ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात केली आहे.

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी (OMCs) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात जाहीर केली आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना मोठा दिलासा

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात झालेल्या कपातीचा सर्वाधिक फायदा हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, चहाच्या टपऱ्या आणि इतर खाद्य व्यवसायिकांना होणार आहे. इंधन खर्च कमी झाल्याने त्यांच्या दैनंदिन खर्चात काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.

काय आहेत नवीन दर?

दरकपातीनंतर दिल्लीमध्ये 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 2,728 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी त्याची किंमत 2,930 रुपये होती.

इतर शहरांतील दर पुढीलप्रमाणे:

  • दिल्ली : 2,728 रुपये (पूर्वी 2,930 रुपये)
  • पाटणा : 3,018 रुपये (पूर्वी 3,227 रुपये)
  • लखनऊ : 2,860.50 रुपये (पूर्वी 3,052.50)

घरगुती LPG सिलेंडरच्या दरात बदल नाही

यावेळी 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीच्या दरानेच सिलेंडर खरेदी करावे लागणार आहे.

सध्या प्रमुख शहरांतील घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर :

  • दिल्ली : 942 रुपये
  • कोलकाता : 968 रुपये
  • मुंबई : 941.50 रुपये
  • चेन्नई : 957.50 रुपये

ग्राहकांना काय फायदा होणार?

व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसायाचा खर्च काही प्रमाणात कमी होईल. याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांनाही मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, घरगुती सिलेंडरच्या किमती कायम असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार नाही.