बंगळुरूमधील एका महिलेने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने झेप्टोच्या डिलिव्हरी पार्टनरवर गंभीर आरोप केले आहेत. डिलिव्हरी दिल्यानंतर तो घरात घुसण्याचा हट्ट करत होता, असं तिने म्हटलंय.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात एका महिलेने झेप्टोच्या डिलिव्हरी पार्टनरने तिचा छळ केल्याचा आरोप केला आहे. हा एजंट वारंवार तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता, असं तिचं म्हणणं आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या महिलेने संपूर्ण घटना सांगितली आहे.
ती म्हणाली की, एक डिलिव्हरी पार्टनर ऑर्डर देण्यासाठी तिच्या घरी आला. ऑर्डर दिल्यानंतर त्याने पिण्यासाठी पाणी मागितलं. तिने त्याला पाण्याची बाटली दिली आणि ती सोबत घेऊन जायला सांगितलं. पण, त्याने ती बाटली तिथेच संपवली आणि अजून पाणी मागितलं. इतकंच नाही, तर पुढची पाच मिनिटं तो घरात येण्यासाठी विनंती करत होता, असा दावा तिने केला आहे.
महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने त्याला बाहेर बसायला जागा असल्याचं सांगितलं आणि घरात येण्यास वारंवार नकार दिला. पण तरीही तो घरात येण्याचा हट्ट करतच राहिला.
जेव्हा तिने गेट बंद करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या डिलिव्हरी पार्टनरने पुन्हा बेल वाजवली आणि थोड्या वेळासाठी आत येऊ देण्याची विनंती केली. घाबरून तिने दरवाजा पूर्णपणे बंद केला. यानंतर त्या एजंटने थेट गेटवर जोरजोरात मारायला सुरुवात केली, असंही तिने सांगितलं.
या व्हिडिओमध्ये तिने कंपनीच्या तक्रार निवारण प्रक्रियेवरही टीका केली आहे. जेव्हा तिने ॲपवरून या घटनेची तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला फक्त एक ऑटोमॅटिक रिप्लाय आला की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप वेगाने पसरला आहे. अनेक लोकांनी यावर चिंता व्यक्त केली असून, कंपनीने या आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
अनेक कमेंट्समध्ये लोकांनी क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका युझरने सुचवलं की, झेप्टो आणि ब्लिंकिटसारख्या कंपन्यांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी डिलिव्हरी एजंटची निवड करताना कठोर नियम लावले पाहिजेत. यात पत्त्याची पडताळणी, गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असावा.
झेप्टोने या महिलेच्या पोस्टला उत्तर दिलं आहे: “आम्ही असा अनुभव देऊ इच्छित नाही आणि आम्हाला या प्रकरणाची चौकशी करायची आहे. तुम्ही कृपया तुमच्या ऑर्डरचे तपशील आणि संपर्क क्रमांक डायरेक्ट मेसेजद्वारे शेअर करू शकाल का? माहिती मिळताच आम्ही तात्काळ या प्रकरणाची चौकशी करू.” या घटनेमुळे अशा घटना टाळण्यासाठी कंपन्यांकडे असलेल्या सुरक्षा उपायांबद्दल नक्कीच चिंता निर्माण झाली आहे.


