सार
Union Budget 2024 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून मोदी सरकारमधील 3.0 अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थसंकल्पात नोकरीसह महिला व गरिबांसाठी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
Union Budget 2024 : आज (23 जुलै) देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत सादर करत आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळआतील अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, भारताच्या जनतेने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दर्शवला आहे. पंतप्रधांना ऐतिहासिक अशा तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवडले आहे." अर्थमंत्र्यांनी पुढे म्हटले की, कठीण काळातही भारताची स्थिती मजबूत आहे.
नोकरीसाठी अर्थमंत्र्यांकडून घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नोकरीसाठी अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, आम्ही विशेष करुन रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, एमएसएमई आणि मध्य वर्गावर लक्ष केंद्रित करत आहोत. यामुळे पाच वर्षाच्या काळात 4.1 कोटी तरुणांना लाभ होणार आहे. यासाठी केंद्राकडून 2 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.
पुढे अर्थमंत्र्यांनी म्हटले की, भारताच्या अर्थव्यवस्थेतेत सातत्याने वाढ होत आहे. भारतातील महागाई दर स्थिर असून 4 टक्के असण्याचा अनुमान आहे. गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी वर्गावर लक्ष देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला जाईल. यशिवाय रोजगार, कौशल प्रशिक्षण, एमएसएमई, मध्यम वर्गावरही लक्ष देत त्यांच्यासाठीच्या पाच योजनांसाठी 2 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
5 वर्षे मोफत मिळणार राशन योजना
अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, पुढे देखील पाच वर्षांसाठी मोफत राशन योजना सुरू राहणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधीही पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे. यामुळे 80 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे.
निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, यंदाच्या वर्षात कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची घोषणा करत आहोत. याशिवाय अर्थसंकल्पातील 9 प्राथमिक गोष्टी म्हणजे उत्पादकता, नोकरी, सामाजिक न्याय, शहराचा विकास, उर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि सुधारणांचा समावेश आहे.
सातव्यांदा सादर करतायत अर्थसंकल्प
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सातत्याने सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळीही निर्मला सीतारमण यांच्याकडून चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी पेपरलेस अर्थसंकल्प सादर करत आहेत. आताचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी मजेंटा बॉर्डर असणारी क्रिम रंगातील साडी नेसली आहे. संसदेत अर्थसंकल्प सादर करण्याआधी निर्मला सीतारमण यांनी अधिकाऱ्यांच्या टीमसोबत पारंपारिक ब्रीफकेससाठी फोटोही काढले. टॅबला ब्रीफकेसएवजी एका लाल रंगातील कव्हरमध्ये ठेवले होते. यावर गोल्डन रंगातील राष्ट्रीय प्रतीक दिसून आले. राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर निर्मला सीतारमण थेट संसदेत पोहोचल्या.
आणखी वाचा :
Budget 2024 : कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं?