राजस्थान पोलिसांनी भोपाळमध्ये एका मोठ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक केली असून तिने सात महिन्यात 25 जणांना फसवल्याचा प्रकार समोर आला आहे.
Crime News : मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरातून कार्यरत असलेल्या एका संघटित विवाह फसवणूक टोळीचा पर्दाफाश करत राजस्थान पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २३ वर्षीय अनुराधा पासवान हिला अटक करण्यात आली आहे. गेल्या ७ महिन्यांत तब्बल २५ लग्नं करून, तिने अनेक पुरुषांकडून दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन पलायन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा सुरुवात सवाई माधोपूरच्या विष्णू शर्मा यांच्या तक्रारीने झाली. त्यांनी ३ मे रोजी पोलिसांत तक्रार दिली की, एजंट सुनीता आणि पप्पू मीणा यांनी २ लाख रुपयांच्या मोबदल्यात त्याचं अनुराधाशी लग्न लावून दिलं होतं. २० एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज झाल्यानंतर, २ मे रोजी अनुराधा घरातून दागिने, ३० हजार रुपये आणि मोबाईल घेऊन गायब झाली.
पोलिसांची गुप्त कारवाई आणि अटक राजस्थान पोलिसांनी एका कॉन्स्टेबलला 'बोगस वर' बनवून गुप्त कारवाई सुरू केली. एजंटांकडून अनुराधाचा फोटो मिळाल्यानंतर, पोलिसांनी भोपाळमध्ये तिला अटक केली. चौकशीत उघड झालं की, अनुराधा ही टोळीचा सक्रिय सदस्य आहे. ती दरवेळी वैध कागदपत्रांसह लग्न करून, काही दिवसांत घरातून रोख, दागिने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन पलायन करत असे.
टोळीतील इतर सदस्य कोण?
पोलिस तपासात उघड झालं आहे की, या टोळीत रोशनी, रघुबीर, गोलू, मजबूत सिंग यादव आणि अर्जुन हे सदस्य आहेत. हे सर्व भोपाळचे रहिवासी असून, त्यांचा शोध सुरू आहे.
अनुराधाची पार्श्वभूमी
अनुराधा ही उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील कोल्हुई बाजार येथील रहिवासी आहे. ती पूर्वी एका रुग्णालयात काम करत होती, मात्र पतीसोबत घरगुती वाद झाल्यानंतर ती भोपाळला आली आणि या विवाह फसवणूक टोळीत सामील झाली.
फसवणुकीचा पद्धतशीर डाव
लग्नाचे एजंट व्हॉट्सअॅपद्वारे मुलीचे फोटो दाखवत, वराकडून २ ते ५ लाख रुपये घेऊन लग्न लावून देत. त्यानंतर अनुराधा काही दिवसात गायब होत असे. गब्बर नावाच्या तरुणाशी २ लाख रुपयांत लग्न करून त्यालाही फसवणूक केल्याचं अलीकडील उदाहरण समोर आलं आहे.
पोलिसांचे जनतेला आवाहन
राजस्थान आणि भोपाळ पोलिसांनी नागरिकांना लग्नापूर्वी मुलगा किंवा मुलगी व त्याच्या/तिच्या कुटुंबाची सखोल चौकशी करण्याचे आणि कुठल्याही आर्थिक व्यवहारात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ही टोळी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पसार झाली आहे. पुढील तपास सुरू असून, लवकरच उर्वरित आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


