बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका युवकाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात एका क्रूर घटनेने खळबळ उडवून दिली आहे. परळी शहरातील जलालपूर भागात काही तरुणांच्या गटाने एका युवकाला अक्षरशः झोडपून काढले. या मारहाणीचा हृदयद्रावक व्हिडिओ आता समोर आला असून, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मिळालेल्या माहितीनुसार, जलालपूर येथे एका कार्यक्रमात दोन गटांमध्ये बाचाबाची झाली होती. याच वादाचा बदला घेण्यासाठी दहा ते बारा तरुणांच्या टोळक्याने एका युवकाचे अपहरण केले. त्यानंतर या टोळक्याने त्या तरुणाला निर्दयपणे लाठी आणि बेल्टने बेदम मारहाण केली. व्हिडिओमध्ये मार खाणारा तरुण वेदनेने विव्हळत असल्याचे दिसत आहे, तरीही आरोपींनी त्याला मारणे थांबवले नाही.

या घटनेमुळे परळीत एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला होता. त्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर आली होती. आता ही मारहाणीची नवीन घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नागरिकांकडून मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.