सार
नवीन दिल्ली: अन्नधान्याच्या किमती पुन्हा एकदा वाढल्याच्या पार्श्वभूमीवर, 'भारत ब्रँड' अंतर्गत ग्राहकांना अनुदानित दरात तांदूळ आणि गहू पीठाच्या विक्रीच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी सुरुवात केली.
या योजनेअंतर्गत गहू पीठ प्रतिकिलो ३० रु. आणि तांदूळ ३४ रु. दराने उपलब्ध आहे. एनसीसीएफ, नाफेड आणि केंद्रीय भांडार तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे ५ किलो गहू आणि १० किलो तांदळाच्या पिशव्या ग्राहकांना खरेदी करता येतील. तसेच, काही मॉल्समध्येही हे धान्य उपलब्ध असणार आहे. शिवाय, महानगरांमध्ये छोट्या गुड्स ऑटोद्वारे ठिकठिकाणी विक्रीची व्यवस्था करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्याच्या विक्रीच्या तुलनेत यावेळी गहू पीठाचा दर २.५ रु. आणि तांदळाचा दर ५ रु. ने वाढवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १५.२० लाख टन गहू पीठ आणि १४.५८ लाख टन तांदूळ वितरित करण्यात आला होता.