Bharat Bandh on 9 July : 9 जुलै रोजी देशभरात कामगार आणि शेतकरी संघटनांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे. सरकारच्या धोरणांविरोधात २५ कोटींपेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता असून, अनेक सेवांवर परिणाम होऊ शकतो.

दिल्ली : देशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कामगार आणि शेतकरी संघटनांचा आवाज उठणार आहे. 9 जुलै (बुधवार) रोजी देशभरात ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. २५ कोटींपेक्षा अधिक कर्मचारी व कामगार संपावर जाण्याची शक्यता असून, अनेक महत्त्वाच्या सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याआधी या बंदाची संपूर्ण माहिती घेणं अत्यावश्यक आहे.

भारत बंद कुणी पुकारला आहे?

देशातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्याशी संलग्न शेतकरी संघटनांनी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि उद्योगपूरक धोरणांविरोधात एकत्र येत हा बंद पुकारला आहे. त्यांच्या मते, केंद्र सरकार 'Ease of Doing Business'च्या नावाखाली कामगारांचे हक्क, सुरक्षाव्यवस्था आणि सामूहिक सौदाशक्ती (Collective Bargaining) दडपते आहे.

बंदमागील कारणं काय आहेत?

चार कामगार संहितांमुळे कामगारांचे हक्क धोक्यात

श्रम परिषदांचे आयोजन गेल्या १० वर्षांपासून बंद

बेरोजगारी, महागाई, वेतन कपात आणि सामाजिक खर्चात घट

नियमित भरतीऐवजी निवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती

या सगळ्यामुळे कामगार, शेतकरी, ग्रामीण मजूर आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

कोणत्या सेवा ठप्प राहतील?

बंदमुळे खालील सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित होण्याची शक्यता आहे.

बँकिंग सेवा

विमा आणि टपाल विभाग

कोळसा खाणकाम व कारखाने

राज्य परिवहन सेवा

सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम

काय सुरू राहील?

काही महत्त्वाच्या सेवा बंदातून वगळल्या जातील.

शाळा आणि महाविद्यालये

खासगी कार्यालये

रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा

रेल्वे सेवा कशा राहतील?

सध्या रेल्वे संपाची अधिकृत घोषणा नाही, मात्र मोठ्या आंदोलनामुळे रेल्वेसेवांमध्ये विलंब किंवा काही ठिकाणी अडथळे येऊ शकतात.

संघटनांचे आवाहन

‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’च्या अमरजीत कौर यांनी सांगितले की, “या बंदात देशभरातील २५ कोटींपेक्षा जास्त कामगार सहभागी होतील आणि हे आंदोलन ‘भव्य आणि यशस्वी’ करण्याचा निर्धार केला आहे.”

9 जुलैचा भारत बंद हा फक्त एक संप नाही, तर कामगारांच्या हक्कांसाठीचा लढा आहे. नागरिकांनी या दिवशी प्रवास करताना काळजी घ्यावी आणि आवश्यक असलेल्या सेवा अगोदरच पार पाडाव्यात.