रेल्वे विभागाने बंगळुरूहून मंगळुरूला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खूशखबर दिली आहे. लवकरच या दोन शहरांदरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असून, हा प्रवास अवघ्या ७ तासांत पूर्ण करता येईल.
बंगळुरूहून मंगळुरूला जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाने एक आनंदाची बातमी दिली आहे. सध्या या मार्गावर ट्रेनने प्रवास करण्यासाठी किमान ९-१० तास लागतात. पण आता हा प्रवास अवघ्या ७ तासांत पूर्ण होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. या दोन शहरांदरम्यान नवीन 'वंदे भारत' ट्रेन सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. विद्युतीकरण आणि ट्रॅकच्या चाचण्या पूर्ण झाल्यावर काही आठवड्यांतच बंगळुरू-मंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस (Bengaluru Mangaluru Vande Bharat Express) प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल.
कुठे असेल थांबा?
ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस बंगळुरूहून निघून मंगळुरू, उडुपी, कारवार आणि गोवा या भागांना जोडेल. यामुळे किनारपट्टीच्या भागांना वेगवान आणि जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी मिळेल, असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
असा असेल प्रवास
५ सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या चाचणीदरम्यान काही तांत्रिक बिघाड समोर आले होते. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी वंदे भारत एक्सप्रेसने आपली दुसरी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. १६ डब्यांची ही ट्रेन सकाळी ६:५० वाजता यशवंतपूरहून सुटून दुपारी १:५५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचली. या प्रवासाला सुमारे सात तास पाच मिनिटे लागली, जे नियोजित वेळेपेक्षा (दुपारी २:५०) लक्षणीयरीत्या कमी होतं.
परतीच्या प्रवासात ही ट्रेन दुपारी २:२५ वाजता मंगळुरू जंक्शनवरून निघून रात्री ९:१४ वाजता यशवंतपूरला पोहोचली. म्हणजेच परतीचा प्रवास फक्त सहा तास ४९ मिनिटांत पूर्ण झाला, ज्यासाठी सात तास २० मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली होती. नैऋत्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने ही दुसरी चाचणी यशस्वी ठरल्याचं सांगितलं. मात्र, पहिल्या चाचणीवेळी सकलेशपूर-सुब्रह्मण्य रोड घाट विभागात काही तांत्रिक अडचणी आल्याने ट्रेनला दोन तास उशीर झाला होता. या अडचणी ओव्हरहेड उपकरणांशी (विद्युत तारांची यंत्रणा) संबंधित होत्या.












