सार

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये विराजमान होणारी रामलला यांची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. यानिमित्ताने ‘एशियानेट न्यूज’ने अरुण योगीराज यांच्यासोबत खास बातचीत केली आहे.

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिरामध्ये 22 जानेवारीला रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. मंदिरामध्ये विराजमान होणारी रामलला यांची मूर्ती कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारली आहे. यानिमित्ताने ‘एशियानेट न्यूज’ने अरुण योगीराज यांच्यासोबत खास बातचीत केली आहे.

'रामलला यांचा शोध घेत होतो…'

योगीराज म्हणाले की, "मी सतत पाषाणाच्या माध्यमातून रामलला यांचा शोध घेत होतो आणि अखेर त्यांनी मला दर्शन दिले. हा सर्वात मोठा आनंद आहे. सर्वांना ही मूर्ती खूप आवडली आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. श्री राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने माझ्या आवश्यकतेनुसार मला निवारा उभारून दिला. 

पाषाणाचे काहीही नुकसान होऊ नये, याकरिता खालील बाजूस मातीची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी मला शरयू नदीच्या काठावरील माती उपलब्ध करून दिली. हे काम करत असताना मी फार आनंदी होतो. ज्या पाषाणातून प्रभूंची मूर्ती घडवण्यात आली आहे, ते पाषाण एका शेतकऱ्याच्या शेतातून काढण्यात आले होते.

पुढे ते असेही म्हणाले की, "मंदिरामध्ये स्थापित करण्यासाठी मी साकारलेल्या मूर्तीची निवड करण्यात आल्याची माहिती मला 30 डिसेंबर 2023 रोजी समजली. यानंतर मला नीट झोप लागली नाही. सुरुवातीला मी थोडासा घाबरलो होतो. याबाबत मी कोणालाही काहीही न सांगण्याचे ठरवले. मला बाहेरील जगापासून दूर राहून शांत आणि संयम राखायचे होते. त्यानंतर ही पहिलीच वेळ आहे, मी घराबाहेर पडलो आणि तुमच्याशी संवाद साधत आहे.

Ram Mandir EXCLUSIVE! Arun Yogiraj, sculptor of Ram Lalla idol, speaks to Asianet News

योगीराज वयाच्या 11व्या वर्षापासून करताहेत काम

शिल्पकार म्हणून त्यांच्या प्रवासाविषयी विचारले असता योगीराज म्हणाले की, "माझे घर आणि जेथे काम करतो, ही दोन्ही ठिकाणं जवळ आहेत. त्यामुळे मी घरामध्ये असलो तरीही गुरुकुल माझ्याशी नेहमीच जोडलेले असते. मला स्पष्टपणे आठवते की माझ्या वडिलांना मदत करण्यासाठी मी मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली. यापूर्वी आम्ही ग्रेनाइटवर नावाच्या पाट्या तयार करत होतो. मी वयाच्या 11व्या वर्षापासून काम करत आहे. लहानपणी देखील मी ज्येष्ठ कलाकारांपेक्षा तुलनेने अधिक वेगाने काम करायचो. यामुळेच रामललांची मूर्ती साकारण्यात मला खूप मदत मिळाली."

शिल्पकलेचा वारसा

योगीराज म्हणाले, "माझ्या वडिलांना मदत करण्यासाठी मी जे काम सुरू केले, त्यामुळे माझी या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली. वडिलांनी जे काही शिकवले, त्यामुळे मी घडलोय. माझ्या वडिलांनी ही कला त्यांच्या वडिलांकडून शिकली होती. माझे आजोबा 25 वर्षे गुरुकुलमध्ये विद्यार्थी होते. हे कौशल्य माझ्या आजोबांकडून वडिलांना आणि वडिलांकडून मला मिळाले. वारशाची ही झलक माझ्या मूर्तीमध्येही दिसते. माझ्या मूर्तीशी लोक सहज जोडले जातात”.

रामललांची मूर्ती घडवणे खूप आव्हानात्मक होते - योगीराज

रामललांची मूर्ती घडवण्याबाबत योगीराज म्हणाले की, "हे काम खूप आव्हानात्मक होते. ग्रॅनाइट हे अतिशय कठीण स्वरुपात असते. यास तडे जाण्याची शक्यता असते. ही मूर्ती अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी स्थापित करण्यात येणार होती, त्यामुळे माझ्यावर दबाव होता. सुरुवातीला मी दररोज तीन तास काम केले. यानंतर पुढील दोन महिने जवळपास 21 तासांसाठी काम केले. आम्ही आमचे काम आठ-आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये विभागले. प्रत्येक कलाकाराला आपल्या शिफ्टमध्ये येऊन काम करायचे होते. कामाच्या वेळेस मी हजर असायचो आणि त्यांना सूचनाही देत असे”.

आणखी वाचा

Ram Lalla Murti : श्री राम मंदिरातील रामललांच्या मूर्तीची पहिली झलक

PM Modi Solapur Visit : भक्तिमय वातावरणात गृहप्रवेश झालाय, नव्या घरांमध्ये राम ज्योती प्रज्वलित करा - PM मोदींचे आवाहन

VIDEO : पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी मंदिरावर आधारित 6 स्मारक टपाल तिकिटे केली प्रसिद्ध

Prabhu Shri Ram Upasana : प्रभू श्री राम या नामाचे रहस्य व उपासनेचे महत्त्व, जाणून घ्या सविस्तर